महाराष्ट्राला गेल्या अनेक दिवसांपासून पावसाचा तडाखा बसत आहे. राज्यातील अनेक भागांना पावसाचा जोरदार फटका बसल्याने मोठं नुकसान झालं आहे. पूरस्थिती निर्माण झाल्याने अनेकांच्या घरात शेतात,दुकानात,एवढंच नाही तर ग्रामीण रुग्णालय, बँक,शासकीय कार्यालयांमध्ये देखील पाणी शिरलं आहे. शेतांना तलावाचं स्वरूप आल्याने शेतीच मोठं नुकसान झालं आहे. यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे. राज्यातील पावसाच्या स्थितीचा घेतलेला हा थोडक्यात आढावा :
Beed Rain: बीड जिल्ह्यात मध्यरात्री दमदार पाऊस अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
काल दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने मध्यरात्री पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली. या पावसाने बीड शहरातील बिंदुसरा नदीला रौद्ररूप प्राप्त झाले असून शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. दरम्यान, नदीच्या वाढलेली पाणी पातळी पाहता प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून पुरात अडकलेल्या नागरिकांना NDRF च्या मदतीने बाहेर काढण्यास यश आले आहे. त्यामुळे परिस्थिती पाहता प्रशासनाने शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
पावसाने धुमाकूळ घातल्याने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, यांनी पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. तर बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. तसेच गिरीश महाजन यांनी नागरिकांनी सतर्कता बाळगावी व आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये, तसेच धोकादायक पूल, वाहते पाणी किंवा कुठल्याही धोकादायक परिस्थितीमध्ये जाऊ नये, असे आवाहन केले आहे.
Dharashiv Rain: धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन पाहणी करणार
धाराशिव जिल्ह्याला देखील पावसाने झोडपून काढले आहे. नद्यांना आलेल्या पुराणे नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. नागरिकांच्या घराचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन काल रात्रीमध्ये धाराशिव जिल्ह्यातील भूम, परांडाकडे रवाना झाले असून आज अतिवृष्टी, पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार असून मदत व बचावकार्याचा आढावा घेणार असल्याची माहिती आहे.
Buldhana Rain : अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना फटका; शेतीचे मोठे नुकसान
काल रात्री झालेल्या अतिवृष्टीचा फटका बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा, लोणार, बुलढाणा, मोताळा या चार तालुक्यांना बसला असून या चारही तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोयाबीन, उडीद, मुग, ज्वारी, कापूस, मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून प्रशासनाने थेट अंतिम पंचनामे करावेत, अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
जिल्ह्यात काल रात्री सर्वात जास्त पाऊस सिंदखेड राजा तालुक्यातील सोनोशीमध्ये 176 मिलिमीटर बरसला. त्यामुळे या महसूल मंडळात सर्वात जास्त नुकसान झाल्याच ही समोर आल आहे. मात्र, गेल्या 24 तासांपासून जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. सध्या जिल्ह्यात कुठेही पूरस्थिती नसून जनजीवन पूर्वपदावर आल आहे.
Parbhani Rains: परभणी जिल्ह्यातील दोन्ही प्रकल्पातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग
परभणी जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे येलदरी आणि लोअर दुधना या दोन्ही प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय. येलदरीचे सर्व 10 दरवाजे उघडून 32 हजार आणि लोअर दुधनाचे 16 दरवाजे उघडून 27 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आल्याने पूर्णा आणि दुधना या दोन्ही तसेच गोदावरी नदी अशा 3 ही नद्यांना पूर आला असून नदीकाठच्या गावांमधील पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
मुसळधार पावसाने परभणीच्या मानवत तालुक्यातील टाकळी नीलवर्ण गावचा संपर्क तुटला. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे परभणीच्या लोअर दुधना प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे दुधना नदीला पूर आला आणि या पुरामुळे अनेक गावांना पुराचा वेढा पडला आहे. मानवत तालुक्यातील टाकळी नीलवर्ण गावातील पूल पूर्णता पाण्याखाली गेल्याने शेतीतील पीकेही पाण्याखाली गेले आहेत.
Latur Rain: लातूरमध्ये मुसळधार पाऊस; तेरणा नदीला पूर, उजनी गाव जलमय
लातूरला देखील मुसळधार पावसाचा फटका बसला असून तेरणा नदीला आलेल्या पुराने उजनी गाव जलमय झाले असून गावातील ग्रामपंचायत कार्यालय, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा, जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक शाळेमध्ये पाणी शिरलं आहे. यासोबतच शेतात देखील पुराचे पाणी शिरल्याने जवळपास हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाच्या हाहाकाराने त्रस्त झालेल्या नागरिकांकडून प्रशासनाकडून मदतीची मागणी केली जात आहे.
Nashik Rain: नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार
राज्यातील इतर शहरांप्रमाणेच नाशिकमध्ये देखील पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. नाशिकच्या गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे 6 क्युसेक हुन आता 2 हजार 272 क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. काल रात्रीपासून शहर आणि जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु असल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार असल्याने नदी परिसरात राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
Jalgaon Rain: जळगावमधील ग्रामीण रुग्णालयाला पुराच्या पाण्याचा विळखा
भडगाव तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने, कुऱ्हा नाल्याला प्रचंड मोठा पूर आल्याने पुराचे पाणी शहरातील ग्रामीण रुग्णालयात शिरले होते. कमरे एवढं पाणी रुग्णालयात शिरण्यामुळे रुग्णसेवा विस्कळीत झाल्याचा पाहायला मिळालं. पुरामुळे मोठ्या प्रमाणात रुग्णालयात पाणी शिरल्याने भडगाव ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका आणि रुग्णांना ट्रॅक्टरमधून सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. मात्र, आज पाऊस कमी झाल्याने पाणी ओसरल्याचे पाहायला मिळत आहे. पुरामुळे तरुण वाहून गेल्याचीव धक्कादायक घटना देखील यावेळी घडली. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील भाकरी गावातील तरुण सतीश चौधरी हा शेतातून घरी परतत असताना ,काल सकाळच्या सुमारास गावाच्या नाल्यात वाहून गेल्याची घटना घडली होती. दरम्यान, त्याच शोध घेतला जात आहे.
Jalna Rain: जालन्यातील गावात गोदावरी नदीच्या पुराचे पाणी; जनजीवन विस्कळीत
जालन्यातील परतुर तालुक्यातील गोळेगाव गावात गोदावरी नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं होत. काल मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अचानक गोदावरी नदीच्या पुराचे पाणी गावात शिरल्याने गावकऱ्यांना गावाबाहेर मुक्काम करावा लागला. दरम्यान, गोदावरी नदीपात्रामध्ये पाणी पातळीत वाढ होत असल्याने परतुर तहसीलदारांनी खबरदारी म्हणून ग्रामस्थांना दुसऱ्या गावात हलवले आहे. जालन्यात मुसळधार पावसाने जिल्ह्यातील बदनापूर आणि अंबड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे या दोन तालुक्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या सुखना नदीला पूर असून सततच्या पावसाने पिकांचे देखील मोठ नुकसान झाल आहे. यामुळे सोयाबीन आणि कपाशीचे पीक पाण्याचं बुडाल्याच पहायला मिळत आहे.
Solpaur Rain: सोलापूर जिल्ह्यामध्ये रात्री धुवांधार पाऊस, सीना नदीला महापूर
सोलापूर जिल्ह्यामध्ये रात्री धुवांधार पाऊस झाल्याने सीना नदीला महापूर आला. यामुळे मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील सीना नदी काठच्या गावांना महापुराचा धोका निर्माण झालं आहे. गेल्या दोन दिवसापासून सीना नदी पात्रात 2 लाख पेक्षा जास्त पाणी आलं सोडण्यात होत. पुरामुळे वैराग जवळील इर्ले गावातील मोहोळ माढा तालुक्याला जोडणारा बंधारा पाण्याखाली गेला. सीना नदीच्या भोगावती आणि चांदणी नदी धोका पातळी सोडून वाहत असल्यामुळे अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील गावांमध्ये काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेकडून पूरग्रस्त गावात पाहणी करण्यात आली आहे. यासोबतच सोलापूरसह राज्यभरात पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून मदत करा. तसेच
केंद्र शासनाने महाराष्ट्रासाठी या पूर परिस्थितीसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची केली आहे.