महाराष्ट्राला गेल्या अनेक दिवसांपासून पावसाचा तडाखा बसत आहे. राज्यातील अनेक भागांना पावसाचा जोरदार फटका बसल्याने मोठं नुकसान झालं आहे. पूरस्थिती निर्माण झाल्याने घर,शेत,दुकान, ग्रामीण रुग्णालय, बँक,शासकीय कार्यालयांमध्ये देखील पाणी शिरलं आहे. शेतांना तलावाचं स्वरूप आल्याने शेतीच मोठं नुकसान झालं आहे. यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे. मराठवाड्यासह राज्यातील इतर भागांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्य सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर केला जावा, अशी मागणी शेतकऱ्यांसह अनेक आमदारांकडून केली जात आहे. यावर आता हालचाली होत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर केला जाण्याची दाट शक्यता आहे. राज्यात पावसाने घातलेल्या धुमाकुळाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक असून यावेळी सर्व मंत्र्यांकडून एकमुखाने ओला दुष्काळा जाहीर करण्याचा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. बैठकीपूर्वी राज्याचे कृषीमंत्री दत्ता भरणे आणि मदत व पुनवर्सन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण संकेत दिले.
कृषीमंत्री आणि मदत व पुनवर्सन मंत्र्यांनी दिले राज्य सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर होऊ शकण्याचे संकेत
राज्यातील पावसाविषयी प्रतिक्रिया देताना कृषिमंत्री दत्त भरणे यांनी म्हटलं, कि “राज्यातील जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. हे निसर्गाचे संकट आहे, त्याचा धीराने सामना करावा लागेल. शासन आपल्या पाठीमागे आहे. पंचनामे पूर्ण झालेल्यांना नुकसान भरपाई दिली आहे. बाकी काहींना दिवाळीपर्यंत मदत दिली जाईल,” असे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. यावेळी त्यांना राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत विचारल्यानंतर त्यांनी म्हटले की,”कोणतीही मागणी करताना निकष बघणे महत्त्वाचे आहे. मात्र, शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, अशी शासनाची भूमिका असून राज्य किंवा केंद्राची मदत ठरली आहे. काही काळ रक्कम वाढवली होती. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमोर आज अहवाल ठेवला जाईल. शेतकऱ्यांसाठी योग्य तो चांगला निर्णय घेतला जाईल. जनावरे वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना देखील मदत केली जाईल. राज्यात 70 हजार एकर पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान नांदेड, यवतमाळ, जालना, परभणी, बीड जिल्ह्यांमध्ये झाले आहे. एकूण ३० जिल्ह्यात शेतीच्या पिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली.
राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत
याविषयी बोलताना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटीलयांनी म्हटलं कि,”राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री हे संबंधित भागातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठं नुकसान झाले आहे. शेती, घरांची पडझड आणि नुकसान झाले आहे. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या”चे मकरंद आबा पाटील यांनी म्हटले. यापुढे ते म्हणाले,”शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. यासंदर्भात योग्य तो विचार विनिमय करुन निर्णय घेतला जाईल. यापूर्वी देखील राज्य सरकारने वेळोवेळी शेतकऱ्यांना जीआर काढून नुकसान भरपाई दिली होती. जुलै महिन्यापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये 721 कोटी, नाशिकमध्ये 13.77 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. ऑगस्टमध्ये पुणे विभागासाठी 14.29, नागपूर विभागाला 23.85 कोटी आणि अमरावती विभागाला 565.60 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. तर कोकणाला 10.53 कोटी रुपये देण्याचे निर्देश देण्यात आले होते. ही सगळी मिळून राज्य सरकारने खरीप हंगामासाठी आतापर्यंत 2200 कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले,” असल्याचेही मकरंद पाटील यांनी सांगितले.