अबुधाबी : आशिया चषकातील सुपरफॉर फेरीतील तिसरा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका क्रिकेट संघात येथील शेख जायद क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात अखेर पाकिस्तान धडपडत विजय मिळवत स्पर्धेतील आपलं आव्हान कायम राखलं आहे. तर या पराभवासह श्रीलंकेचा सुपर-4 फेरीतील हा दुसरा पराभव असून त्यांना अंतिम फेरी गाठणं जवळजवळ अशक्य झालं आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं 133 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्ताननं पाच गाड्यांच्या मोबदल्यात 134 धावा करत सामना आपल्या नावावर केला.
श्रीलंकेची फलंदाजी अपयशी :
या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघानं नाणेफेक जिंकत श्रीलंकेला प्रथम फलंदाजीचा आमंत्रण दिलं. यानंतर फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेची सुरुवात अत्यंत खराब झाली. डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर सलामीवीर कुशल मेंडीस एकही धाव न करता बाद झाला. यानंतर ठराविक अंतरानंतर श्रीलंकेच्या विकेट पडत गेल्या. परिणामी त्यांचा डाव निर्धारित 20 षटकांत 8 बाद 133 धावांवर मर्यादित राहिला. संघाकडून कमिंडू मेंडीसनं एकमेव अर्धशतक झळकावत सर्वाधिक 50 धावा केल्या. त्याच्याशिवाय चरिथ असलंका (20), कुशल परेरा (15), वनिंदू हसरांगा (15) आणि शेवटी चमिका करुणारत्ने (17) यांनी काहीसं योगदान दिल्यानं सांघाला 133 धावांपर्यंत मजल मारता आली. गोलंदाजी पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीनं सर्वाधिक 3 तर हरीस रौफ आणि हुसेन तलत यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.
पाकिस्तानचा 18व्या षटकात विजय :
श्रीलंकेनं दिलेल्या 134 धावांचा पाठलाग करायला मैदानात उतरलेल्या पाकिस्ताननं संयमी सुरुवात केली. संघाचे सलामेवीर साहबझादा फरहान (24) आणि फकर झमान (17) यांनी पहिल्या विकेटसाठी 33 चेंडूत 45 धावांची भागीदारी केली. यावेळी पाकिस्तानचा संघ हा सामना लवकर संपवेल असं वाटत असतानाच श्रीलंकेच्या गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन करत पाकिस्तानच्या 12 धावा 4 विकेट घेत त्यांची अवस्था 4 बाद 57 अशी केली. मात्र यानंतर मोहम्मद नवाज (38) आणि हुसेन तलत (32) यांनी 58 धावांची अभेद्य भागीदारी करत संघाला 18व्या षटकात विजय मिळवून दिला. श्रीलंकेकडून गोलंदाजीत वनिंदू हसरांगा आणि महेश तीक्षणा यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या.