नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या देवी चंद्रघंटेला नवदुर्गांमधील तिसरे रूप मानले जाते. तिच्या कपाळावर घंटा-आकाराचा अर्धचंद्र शोभतो आणि तिसरा डोळा नेहमी उघडा असतो, हे तिच्या सतत जागृत असण्याचे व वाईट शक्तींविरुद्ध लढण्याच्या तयारीचे प्रतीक आहे. सिंह हे तिचे वाहन असून ती आपल्या भक्तांना शौर्य, धैर्य आणि पापमुक्ती प्रदान करते.
देवीचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये
चंद्रघंटा देवीच्या नावाचा अर्थ होतो, चंद्र + घंटा म्हणजे घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र. देवीचा सोन्यासारखा तेजस्वी देह असून तिला दहा हात असून ललाटावर अर्धचंद्र. देवीच्या हातात त्रिशूल, गदा, तलवार, कमंडलू, धनुष्य-बाण, जपमाळ, पुष्प व कमळ असे शस्त्रास्त्रे व शुभचिन्हे आहेत. तर तिचे वाहन सिंह असून तिचा तिसरा डोळा नेहमी उघडा असतो, जो तिच्या जागरूकतेचे व दुष्टांचा नाश करण्याच्या तत्परतेचे प्रतीक आहे.
देवीच्या पूजेचे महत्व आणि फायदे
देवी चंद्राघंटेच्या कृपेने भक्तांचे दुःख, त्रास व मानसिक क्लेश दूर होतात. माता चंद्रघंटा भक्तांमध्ये धैर्य, आत्मविश्वास व विजयाची भावना निर्माण करते. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी या रूपाची पूजा केली जाते. ज्यामुळे जीवनातील अडथळे दूर होऊन यश, प्रगती आणि कीर्ती प्राप्त होते.
पूजा विधी
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यावे. व्रताचा संकल्प करून चंद्रघंटा देवीची पूजा करावी. पिवळ्या किंवा सोनेरी वस्त्र धारण करणे शुभ मानले जाते. पांढऱ्या रंगाच्या मिठाई (खीर, बर्फी) आणि मध नैवेद्य म्हणून अर्पण करावा. देवीला पांढऱ्या फुलांचा हार अर्पण करावा.
मंत्र
पूजेवेळी खालील मंत्र म्हणणे शुभ मानले जाते:
“पिण्डजप्रवरारूढा चण्डकोपास्त्रकेर्युता।
प्रसादं तनुते मह्यं चंद्रघण्टेति विश्रुता॥”
“या देवी सर्वभूतेषु मां चंद्रघंटा रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमो नमः॥”
चंद्रघंटा देवीची कथा
पार्वती माता आणि भगवान शिव यांच्या विवाहावेळी महादेव भस्ममंडित रूपात भूत-प्रेतांची वरात घेऊन आले होते. हे भयंकर दृश्य पाहून हिमालय दरबारात भीतीचे वातावरण निर्माण झाले. राणी मीनावती भयभीत झाल्या.
तेव्हा पार्वती मातेनं चंद्रघंटा रूप धारण केलं. तिच्या तेजस्वी अर्धचंद्रामुळे दरबारातील भीती नाहीशी झाली आणि शांतता निर्माण झाली. त्यानंतर भगवान शंकरांनीही मोहक रूप धारण केले व माता पार्वतीसोबत विवाह संपन्न झाला.
या कथेनुसार चंद्रघंटा देवीची उपासना भय दूर करून शांती व धैर्य देते.
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केल्याने साधकाला धैर्य, विजय, आत्मिक शक्ती आणि पापमुक्ती प्राप्त होते. संकट निवारणासाठी व मानसिक शांतीसाठी या देवीची आराधना विशेष फलदायी मानली जाते.