दुबई : आशिया चषकातील सुपर-4 फेरीतील चौथा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघात खेळवण्यात आला. या सामन्यात अपेक्षेप्रमाणे भारतीय संघाने वर्चस्व राखत 41 धावांनी विजय मिळवला. यासह टीम इंडियानं आशिया चषकाच्या फायनलमध्ये आपलं तिकीट बुक केलं आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकात 6 बाद 168 धावा उभारल्या प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 19.3 षटकांत 127 धावांवर मर्यादित राहिला.
अभिषेक शर्माचं पुन्हा वादळी अर्धशतक :
या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार जाकेर अलीनं नाणेफेक जिंकत टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. यानंतर फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल (29) यांनी नेहमीप्रमाणे आक्रमक सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या 6.2 षटकार 77 धावा जोडल्या. मात्र आक्रमक फटका मारायच्या नादात शुभमन गिल बाद झाला आणि यानंतर ठराविक अंतरानं टीम इंडियाच्या विकेट पडत गेल्या. परिणामी टीम इंडियानं निर्धारित 20 षटकात सहा बाद 168 धावा उभारल्या. संघाकडून सलामीवीर अभिषेक शर्मानं अर्धशतक झळकावत सर्वाधिक 75 धावा केल्या. त्याच्याशिवाय हार्दिक पांड्याही 38 धावांची खेळी केली. कर्णधार सूर्यकुमार यादव (5), शिवम दुबे (2) आणि तिलक वर्मा (5) हे फलंदाज या सामन्यात अपयशी ठरले. बांगलादेशकडून गोलंदाजीत रिषभ हुसेननं सर्वाधिक 2 तर मुस्तफिजूर रहमान, तंझिम हसन शाकिब आणि शैफुद्दीन यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
बांगलादेशचे फलंदाज अपयशी :
टीम इंडियानं दिलेल्या 169 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या बांगलादेशची सुरुवात खराब झाली. डावाच्या दुसऱ्याच षटकात सलामीवीर तंझीद हसन तमीम अवघ्या एका धावेवर बाद झाला. मात्र, यानंतर सैफ हसन आणि परवेज हुसेन (21) यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी झाली. यावेळी बांगलादेशचा संघ शेवटपर्यंत लढत देऊन सामन्यात रंगत निर्माण करेल असं वाटलं होतं. मात्र यानंतर बांगलादेशचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले. परिणामी त्यांचा डाव 19.3 षटकांत 127 धावांवर संपुष्टात आला. संघाकडून सलामीवीर सैफ हसननं सर्वाधिक 69 भावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र इतर कोणत्याही फलंदाजानं त्याला खेळपट्टीवर साथ न दिल्यानं बांगलादेशला पराभव स्वीकारावा लागला. गोलंदाजीत भारताकडून फिरकीपटू कुलदीप यादवनं सर्वाधिक 3 तर वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.