दुबई : आशिया कपचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघात होणार आहे. दोन्ही संघांनी या स्पर्धेत आधीच दोन सामने खेळले आहेत. दोन्ही सामन्यांमध्ये बरीच नाट्यमयता पाहायला मिळाली. दोन्ही संघांनी एकमेकांबद्दल आयसीसीकडे तक्रार केली. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवनं केलेल्या विधानावर पाकिस्ताननं आक्षेप घेतला. सूर्यानं गट टप्प्यातील सामन्यात पाकिस्तानवरील विजय सशस्त्र दलांच्या शौर्याला समर्पित केला होता. त्यांनी सांगितलं की संघ पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींच्या कुटुंबांसोबत उभा आहे.
कर्णधार सूर्यानं स्वतःला केलं निर्दोष घोषित :
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव गुरुवारी आयसीसी मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांच्यासमोर हजर झाला. बीसीसीआयचे सीईओ हेमांग अमीन आणि संघाचे क्रिकेट ऑपरेशन्स मॅनेजर सुमित मल्लापूरकर देखील भारतीय कर्णधारासोबत उपस्थित होते. सूर्यानं स्पष्टपणे आपली निर्दोषता जाहीर केली. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, सूर्यानं आयसीसीच्या सुनावणी पॅनेलला सांगितलं की तो निर्दोष आहे आणि नियमांविरुद्ध कोणतंही विधान केलेलं नाही. त्याच्या प्रकरणावरील आयसीसीचा निर्णय आज जाहीर केला जाईल.
रौफ आणि फरहान राहणार हजर :
सुपर-4 सामन्यादरम्यान पाकिस्तानी सलामीवीर साहिबजादा फरहान आणि वेगवान गोलंदाज हरिस रौफ यांनी केलेल्या हावभावांबाबत बीसीसीआयनं तक्रार दाखल केली आहे. फरहाननं अर्धशतक पूर्ण केल्यानंतर बंदुकीनं सेलिब्रेशन केलं, तर रौफनं चौकार मारल्यानंतर विमान कोसळल्याचा इशारा केला. बीसीसीआयची तक्रार मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्टकडे पाठवण्यात आली आहे. सुनावणी आज होणार आहे. दोन्ही खेळाडूंना पायक्रॉफ्टसमोर हजर राहावं लागेल.
28 सप्टेंबर रोजी होणार अंतिम सामना :
आशिया कप 2025 चा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. एप्रिलमध्ये पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 26 निष्पाप लोकांची हत्या केली. त्यानंतर या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदाच आमनेसामने आले आहेत. गट टप्प्यातील सामन्यादरम्यान सूर्यकुमार यादवनं पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन केलं नव्हतं. सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनीही पाकिस्तानी संघाशी हस्तांदोलन केले नाही. सुपर-4 सामन्यातही असंच पाहायला मिळालं.