गडचिरोली: भामरागड तालुका मुख्यालयात असलेल्या पर्लकोटा नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने पुन्हा एकदा भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. सध्या राज्यभर परतीच्या पावसाने कहर केला असून गडचिरोली जिल्ह्यात देखील मागील तीन दिवसापासून दमदार पावसाने हजेरी लावल्याने नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. विशेष म्हणजे दक्षिण भागात या पावसाने चांगलाच कहर केल्याचे दिसून येत आहे. शिवाय छत्तीसगड राज्यात झालेल्या पावसामुळे इंद्रावती नदीला पूर आला. त्यामुळे भामरागड तालुका मुख्यालयातील पर्लकोटा आणि पामुलगौतम नदी देखील दुथडी भरून वाहत आहे. आज सकाळी ६ वाजता हेमलकसा आणि भामरागड मधोमध असलेल्या पर्लकोटा नदीला पूर आला आणि पूल पाण्याखाली गेला.
शुक्रवार (२६ सप्टेंबर) सकाळी सहा वाजल्यापासून आलापल्ली ते भामरागड रस्त्यावरील रहदारी ठप्प झाली आहे. जवळपास 100 पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी जूनमध्येच भामरागड तालुक्याचा बरेचदा संपर्क तुटत असतो. मात्र, यंदा जून आणि जुलै महिन्यात पाहिजे तसा पाऊस न झाल्याने तशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती. ऑगस्ट महिन्यात जवळपास चार वेळा भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला होता.आता सप्टेंबर महिन्यातही परतीच्या पावसाने चांगलाच कहर केल्याने जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. दरम्यान भामरागड तालुक्यातील इंद्रावती, पामूलगौतम आणि पर्लकोटा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने पुन्हा एकदा भामरागड तालुका मुख्यालयातील नागरिकांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
सध्या पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेले असले तरी तालुका मुख्यालयात नदी काठावर असलेल्या घरामध्ये पाणी शिरल नसल्याने व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने सध्या या मार्गावरील रहदारी बंद झाली आहे. पाण्याची पातळी वाढत असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
-किशोर बागडे,तहसीलदार भामरागड