नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (26 सप्टेंबर) बिहार निवडणुकीच्या अगदी आधी राष्ट्रीय जनता दल (राजद) वर निशाणा साधत म्हटलं की, जेव्हा कंदील सत्तेत होता तेव्हा बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होता. या दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत बिहारमधील 75 लाख महिलांना एक महत्त्वाची भेट दिली. या महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10 हजार रुपये हस्तांतरित करण्यात आले.
बहिणी आणि मुलींच्या स्वप्नांना पंख लागतील :
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “नवरात्रीच्या या शुभ दिवसांमध्ये, मला बिहारच्या महिलांच्या आनंदात सहभागी होण्याची संधी मिळाली. नवरात्रीच्या या शुभ सणावरील तुमचे आशीर्वाद आपल्या सर्वांसाठी एक मोठी शक्ती आहेत. मी माझे मनापासून आभार मानतो. ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’ आज सुरु होत आहे. आतापर्यंत 75 लाख महिला या योजनेत सामील झाल्या आहेत. आता या सर्व ७५ लाख महिलांच्या बँक खात्यात एकाच वेळी प्रत्येकी 10 हजार रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.” तसंच ही प्रक्रिया सुरु असताना, मी बिहारच्या बहिणी आणि मुलींसाठी नितीश कुमार यांच्या सरकारनं उचललेल्या मोठ्या आणि महत्त्वाच्या पावलाबद्दल विचार करत होतो. जेव्हा एखादी बहीण किंवा मुलगी नोकरी करते किंवा स्वयंरोजगार करते तेव्हा त्यांच्या स्वप्नांना नवीन पंख लागतात आणि समाजात त्यांचा आदर आणखी वाढतो.
पंतप्रधान मोदींनी साधला आरजेडीवर निशाणा :
यावेळी बोलताना आरजेडीवर निशाणा साधत पंतप्रधान म्हणाले, “आरजेडीच्या राजवटीत घरात कोणीही सुरक्षित नव्हतं. महिलांना सर्वात जास्त त्रास सहन करावा लागला. महिलांनीही आरजेडी नेत्यांचे अत्याचार पाहिले आहेत, परंतु नितीश यांच्या राजवटीत मुली निर्भयपणे फिरतात. आम्ही महिलांच्या संरक्षणासाठी उज्ज्वला योजना सुरु केली आहे. जेव्हा सरकार महिलांना केंद्रस्थानी ठेवून धोरणं आखतं तेव्हा त्याचा समाजातील इतर घटकांनाही फायदा होतो. उदाहरणार्थ, उज्ज्वला योजनेमुळं झालेल्या गंभीर बदलाचे साक्षीदार संपूर्ण जग आहे. या मोहिमेअंतर्गत गावं आणि शहरांमध्ये 4,50,000 हून अधिक आरोग्य शिबिरं आयोजित केली जात आहेत. अशक्तपणा, रक्तदाब, मधुमेह आणि कर्करोग यासारख्या गंभीर आजारांची तपासणी केली जात आहे.