मुंबई : राज्य सरकारनं शुक्रवारी संध्याकाळी राज्यातील अनेक भागात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला असून रहिवाशांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. महसूल आणि वन विभागानं जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, हवामान विभागानं (IMD) 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि रेड अलर्ट :
आयएमडीनं राज्यातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केला आहे. राज्य आपत्ती ऑपरेशन सेंटर (SEOC) द्वारे सावधगिरी आणि तयारीच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर 28 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 27 सप्टेंबर रोजी विदर्भात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.
मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचं आवाहन :
26 ते 29 सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 27 आणि 28 सप्टेंबर रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसंच सरकारनं जनतेला अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचं, धोकादायक भागात आणि पूरग्रस्त भागात प्रवास करणं टाळावं आवाहन केलं आहे. सरकारी निवेदनात म्हटलं आहे की, वीज कोसळताना लोकांनी झाडांखाली आश्रय घेऊ नये आणि पूर सुरक्षा उपायांचं पालन करावं. आवश्यक असल्यास, स्थानिक मदत छावण्यांचा वापर करावा आणि पूरग्रस्त रस्ते किंवा पूल ओलांडणं टाळावं. तसंच, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि त्या पसरवण्यापासून परावृत्त व्हावं.