दुबई : आशिया कप 2025 मध्ये टीम इंडिया आतापर्यंत अजिंक्य राहिली आहे. सुपर फोर फेरीतील शेवटचा सामना शुक्रवारी (26 सप्टेंबर) भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात टीम इंडियानं सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना निर्धारिक 20 षटकात 202 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेनंही दमदार फलंदाजी करत 20 षटकात 202 धावांपर्यंत मजल मारली. अशा स्थितीत सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
सुपर ओव्हरमध्ये काय झालं? :
अर्शदीप सिंगनं टाकलेल्या सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेनं 2 धावा केल्या, म्हणजेच भारताला जिंकण्यासाठी केवळ 3 धावांची आवश्यकता होती. त्यानंतर भारतानं पहिल्याच चेंडूवर 3 धावा करून सामना खिशात घातला. वानिंदू हसरंगाच्या पहिल्याच चेंडूवर सूर्यकुमार यादवनं तीन धावा केल्या. दरम्यान, टीम इंडियानं आधीच फायनल गाठली आहे. जेतेपदासाठी भारत आणि पाकिस्तान रविवारी (28 सप्टेंबर) भिडतील.
अभिषेकचं पुन्हा वादळी अर्धशतक :
या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार चरिथ असलंका यानं नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचा आमंत्रण दिलं. यानंतर फलंदाजीला आलेल्या भारतीय फलंदाजांनी संधीचं सोनं करत 20 षटकांत 5 बाद 202 धावा केल्या. सलामीवीर अभिषेक शर्मानं नेहमीप्रमाणे वादळी अर्धशतक झळकावलं. त्यानं 31 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्यानं 61 धावा केल्या. त्याच्यासह तिलक वर्मा (49), संजू सॅमसन (39) आणि अक्षर पटेल (21) यांनीही उपयुक्त खेळी केली. परिणामी संघानं 200 चा टप्पा गाठला. गोलंदाजीत श्रीलंकेकडून महेश तीक्षणा, दुश्मनथा चमीरा, वनिंदू हसरांगा, दसून शनका आणि चरिथ असलंका यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
श्रीलंकेचा डाव :
भारताच्या 203 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. कुसल मेंडिस स्वस्तात बाद झाला. पण यानंतर सलामीवीर पथुम निस्संका आणि कुसल परेरा क्रीजवर टिकून राहिले. दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी केली. कुसल परेरानं 32 चेंडूत 8 चौकार आणि एका षटकारासह 58 धावा चोपल्या. वरुण चक्रवर्तीनं कुसल परेराला बाद करून ही भागीदारी तोडली. त्यानंतर भारतानं चरिथ असलंका आणि कामिंदू मेंडिस यांचे झटपट बळी घेतले. तथापि, निस्संका याच्या शतकानं सामना रोमहर्षक स्थितीत पोहोचवला. पथुम निस्सांकानं 58 चेंडूत 107 धावांचा पाऊस पाडला, ज्यात 7 चौकार आणि 6 उत्तुंग षटकारांचा समावेश होता.