आज नवरात्रीतील सातवा दिवस या दिवशी देवी कालरात्रीची पूजा जाते. देवी कालरात्री ही दुर्गा देवीचे सातवे स्वरूप असून, ती ‘शुभांकरी’ म्हणूनही ओळखली जाते, कारण ती भय आणि अंधार दूर करून उपासनेचे शुभ फळ देते. देवी कालरात्रीचे रूप उग्र असले तरी देवी भक्तांना निर्भय बनवते आणि दुष्टांचा नाश करते. विशेष म्हणजे देवी कालरात्री गाढवावर स्वार असते आणि तिच्या श्वासातून अग्नीच्या ज्वाळा निघतात, असे वर्णन केले जाते.
देवी कालरात्रीचे स्वरूप आणि शुभ चिन्ह
कालरात्री देवीचे रूपाचे वर्णन करताना असे सांगितले जाते, कि तिचे शरीर अंधाऱ्या रात्रीसारखे काळे असून, केस विखुरलेले असतात. देवी कालरात्री चारभुजा असून तिच्या चार हातांपैकी एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात खड्ग किंवा लोखंडी शस्त्र, तर तिसरा हात अभयमुद्रा (संरक्षण) आणि चौथा हात वरमुद्रा (आशीर्वाद) दर्शवतो. ती गाढवावर स्वार असून देवीचे डोळे ब्रह्मांडाप्रमाणे विशाल आणि गोल असून तिची दृष्टी विजेसारखी तेजस्वी असते, असे सांगितले जाते.
उपासनेचे महत्व
कालरात्री देवी दुष्टांचा नाश करणारी आणि सर्व संकटांवर मात करणारी आहे. या देवीची उपासना केल्याने भक्तांमधील भीती, मानसिक तणाव आणि अज्ञात भय कमी होते. ती शनिग्रहाच्या वाईट प्रभावांना नष्ट करून भक्तांना निर्भय आणि बलवान बनवते.
पूजन विधी
नवरात्रीच्या सातव्या दिवशी सकाळी स्नान करून मातेची पूजा करावी. देवीला अखंड फुले, फळे, कुंकुम, धूप, दीप, सुगंध, नैवेद्य इत्यादी अर्पण करून त्यांची पूजा करावी. कालरात्री देवीच्या मंत्रांचा जप करावा आणि गुळाचा नैवेद्य दाखवावा. या पूजेने भक्तांचे सर्व दुःख आणि अडथळे दूर होतात. दुर्गा देवीच्या कालरात्रि स्वरुपाचे पूजन केल्यानंतर यथाशक्ती, यथासंभव मंत्र जप करावा, असे सांगितले जाते.
‘ऊं ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चै ऊं कालरात्रि दैव्ये नम:।’
एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थिता, लम्बोष्टी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्तशरीरिणी।
वामपादोल्ल सल्लोहलता कण्टक भूषणा, वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयङ्करी॥
हा कालरात्री देवीचा मंत्र जपल्याने भक्तांचे भय दूर होऊन, भक्त निर्भय होऊन त्यांच्या आयुष्यातील अडथळे दूर होतात,असे सांगितले जाते.
माता कालरात्री ही जरी उग्र स्वरूपाची दिसत असली तरी ती भक्तांना निर्भयतेचे वरदान देणारी आणि अंधारात प्रकाश आणणारी आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी तिच्या पूजनाने मनातील सर्व नकारात्मकता नाहीशी होते आणि जीवनात शुभतेचा व सकारात्मकतेचा प्रकाश पसरतो.