नांदेड – महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले असून संपूर्ण महाराष्ट्र पावसाने हैराण आहे. मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याला पूरस्थिती निर्माण झाली असून यामध्ये नागरिकांच्या घरांचे, शेतीचे,दुकान.रुग्णालय.बँका,शासकीय कार्यालयांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यभरातून मदतीसाठी मागणी होत आहे. अनेक राजकीय नेते दैनंदिन वापरातील वस्तू, वह्या पुस्तके देऊन मदत करत आहेत. तर राज्यातील इतर नागरिक आपल्याला जमेल तशी मदत करत आहेत. तर पुण्यातील एका भाजी वाल्याने लाखभराची मदत पूरग्रस्त नागरिकांपर्यत पोहचवली आहे. यातच आता नांदेडच्या पोलीस निरीक्षकाची देखील भर पडली आहे.
पोलीस म्हणजे गुन्हेगारांना पकडणारे किंवा कायदा व सुव्यास्था राबविण्याकरिता कटिबंध असल्याचे आपण नेहमी पाहतो. मात्र, हे समीकरण मोडीत काढत खाकीतील रक्षकाचे एक वेगळं रूप नांदेडमध्ये पाहायला मिळाले आहे. नांदेडच्या पोलीस निरीक्षकाने आपले एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांसाठी दिले आहे. राज्यात पावसाचे थैमान सूरु असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकट्या नांदेड जिल्ह्यात साडेसहा लाखांच्या जवळपास शेतीपीकाचे नुकसान झाले आहे. तर हजारो नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
यातच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन होत असतानाच, नांदेड येथील ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी त्यांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांसाठी दिले आहे. माहे सप्टेंबर 2025 चे एक महिन्याचे एक लाख रुपये वेतन आपत्कालीन फंडात वर्ग करावे, अशी विनंती पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांना पत्राद्वारे केली आहे. हे पत्र समाजमाध्यमांवर वायरल झाले असून चिंचोलकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.