मुंबई : धनादेश म्हणजेच चेक बँकेत जमा केल्यानंतर पैसे खात्यात जमा होण्यासाठी दोन दिवस वाट पाहावी लागते. मात्र, आता धनादेशाची रक्कम त्याच दिवशी संबंधितांच्या खात्यात जमा होणार आहे. आता त्यासाठी दोन दिवस वाट पाहण्याची गरज लागणार नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) याबाबत नवे बदल केले असून येत्या 4 ऑक्टोबरपासून हे नवे बदल लागू होणार आहेत. मात्र आता त्यामुळे खात्यात रक्कम असल्याची खात्री करूनच धनादेश द्यावा लागणार आहे. कारण आता पूर्वीप्रमाणे खात्यात पैसे जमा करण्यास फार कालावधी मिळणार नाही.
आरबीआयने जरी केले चेक वटवण्याचे नवे नियम
आरबीआयने 13 ऑगस्ट 2025 रोजी काढलेल्या आदेशानुसार, धनादेश वटविण्याचा कालावधी कमी करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी दोन टप्प्यांत होणार आहे. पहिला टप्पा येत्या 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्यानुसार, धनादेश वटवण्यासाठी दिलेल्या दिवसातच पैसै संबंधितांच्या खात्यात जमा होतील. तर, दुसरा टप्पा 3 जानेवारी 2026 पासून सुरू होणार असून त्यानंतर ही प्रक्रिया आणखी वेगवान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यांनंतर काही तासांतच धनादेश वटविला जाणार आहे. सध्या, धनादेश वटविण्यासाठी दिलेला दिवस आणि त्यानंतरचा दुसरा कामाचा दिवस, अशा कालावधीत धनादेश वटविला जातो. आणि जर या दिवसांमध्ये सुट्टी असल्यास धनादेश वटण्याचा कालावधी त्याप्रमाणात वाढतो. मात्र आता हि प्रक्रिया एका दिवसातच होणार आहे.
कशी असेल प्रक्रिया?
आरबीआयने काढलेल्या आदेशानुसार, पहिल्या टप्प्यात सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत विविध बँकांच्या शाखांकडून प्राप्त झालेले धनादेश स्कॅन केले जातील. आणि त्यानंतर बँकांकडून त्वरित आणि सतत क्लिअरिंग हाऊसमध्ये धनादेश पाठवले जातील. क्लिअरिंग हाऊसदेखील धनादेश देणार्या बँकांना सतत धनादेशाचे फोटो पाठवेल.
या प्रक्रियेत बँकांकडून सकाळी 10 वाजता धनादेशावर प्रक्रिया सुरू होईल आणि संध्याकाळी 7 वाजता बंद होईल. सादर केलेल्या प्रत्येक धनादेशासाठी पैसे देऊ करण्याची जबाबदारी असलेली बँक (ड्रॉई बँक) धनादेश वटवेल अथवा खात्यात पैसे नसल्यास त्यासाठी नकारात्मक नोट जारी करेल. पैसे देण्याची जबाबदारी असलेल्या बँकेने धनादेशाची प्रतिमा प्राप्त होताच, धनादेश वटविण्याची अथवा नाकारण्याची प्रक्रिया करावी. प्रक्रिया केल्यानंतर लगेचच पैसे देण्याची जबाबदारी असलेल्या ड्रॉई बँकांनी (सकारात्मक/नकारात्मक) माहिती क्लिअरिंग हाऊसला पाठवावी.
पहिल्या फेजमध्ये नेमकं काय होणार?
चेक वटवण्याच्या या प्रक्रियेतील फेज-1 दरम्यान, 4 ऑक्टोबर ते 2 जानेवारी 2026 पर्यंत ड्रॉई बँकांना सत्राच्या शेवटी म्हणजेच संध्याकाळी 7 वाजता सादर केलेल्या धनादेशांवर (सकारात्मक/नकारात्मक) निर्णय घेणे आवश्यक असेल. संबंधित बँकेने त्यावर कोणतीही कार्यवाही न केल्यास संबंधित धनादेश मंजूर झाले, असा मानून पुढील प्रक्रिया केली जाईल. पहिल्या फेजमध्ये धनादेशची अंतिम वेळ संध्याकाळी 7 असेल.
फेज-2 अशी असेल?
फेज-2 नुसार 3 जानेवारी 2026 पासून, धनादेशावर प्रक्रिया करण्याची मुदत तीन तासांपर्यंत कमी होईल,म्हणजे सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या धनादेशावर बँकांना त्याच दिवशी, दुपारी 2 वाजेपर्यंत (सकाळी 11 वाजेपासून 3 तासांत) कार्यवाही करावी लागेल. म्हणजेच, धनादेश वटणार किंवा नाही याचा अभिप्राय या वेळेत द्याव लागेल. या कालावधीत बँकांनी कोणतीही प्रक्रिया न केल्यास धनादेश मंजूर मानले जातील. दुपारी 2 वाजता धनादेश वटविण्याच्या कार्यवाहीसाठी पाठवले जातील.
पैसे कसे जमा होतील?
सकाळी 11 वाजल्यापासून सत्राच्या समाप्तीपर्यंत दर तासाला धनादेशावर कार्यवाही होईल. क्लिअरिंग हाऊस संबंधित बँकेला सकारात्मक आणि नकारात्मक निर्णयांची माहिती देईल. त्यानुसार बँक प्रक्रिया करेल आणि ग्राहकांना ताबडतोब पैसे देईल. या प्रक्रियेनंतर एक तासाच्या आत संबंधितांच्या खात्यात पैसे जमा करावे लागतील.