राज्यात यावर्षी झालेल्या सततच्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती उद्भवली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान होऊन हजारो गावकऱ्यांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शासनाने मदतीचे आवाहन केल्यानंतर श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव या सार्वजनिक न्यासाने पुन्हा एकदा आपल्या सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवलं आहे. तसेच साईबाबा संस्थानाकडून पूरग्रस्तांसाठी एक कोटी रुपयांची मदत देखील करण्यात आली आहे.
१ कोटी ११ लाख रुपयांचा धनादेश
श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तब्बल १ कोटी ११ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीकडे सोपवण्यात आला आहे. संस्थेचे प्रतिनिधी यांनी २७ सप्टेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सदर मदतीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संस्थेच्या कार्याचे मन:पूर्वक कौतुक करून, “गजानन महाराज संस्थान सातत्याने सेवा कार्याबरोबर जनतेच्या दु:खातही साथ देते, ही समाजासाठी प्रेरणादायी बाब आहे,” अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली. गेल्या अनेक दशकापासून श्री गजानन महाराज संस्थान हे केवळ आध्यात्मिक क्षेत्रापुरते मर्यादित न राहता शैक्षणिक, आरोग्य आणि सामाजिक प्रकल्पामधून आपले योगदान देत आले आहे. विशेष म्हणजे,”राज्यातील आपत्कालीन प्रसंगात संस्थान वारंवार मदतीचा हात पुढे करते. अतिवृष्टी आणि पूरस्थितीने बाधित झालेला शेतकरी कुटुंबांसाठी दिलेला हा एक कोटी अकरा लाखांचा निधी शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी मोलाचा ठरेल”, असा विश्वास संस्थानाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
संकटात सापडलेल्या महाराष्ट्रासाठी साईबाबा धावले
परतीच्या मान्सूनने महाराष्ट्रात जो हाहाकार माजवला आहे, त्यामुळे राज्याची अक्षरशः दाणादाण उडाली आहे. शेती, रस्ते आणि पायाभूत सुविधांचे अतोनात नुकसान झाले असून वित्त आणि जीवितहानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. राज्याच्या या अभूतपूर्व संकटात मानवतेचा संदेश देणारे शिर्डीचे साईबाबा संस्थान धावले असून त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तातडीने १ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
माणुसकीच्या नात्याने घेतला निर्णय
जिल्हा प्रधान न्यायाधीश तथा साई संस्थानच्या अध्यक्ष अंजू शेंडे (सोनटक्के), जिल्हाधिकारी तथा संस्थानच्या त्रिसदस्य समितीचे सदस्य डॉ.पंकज आशिया आणि संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी तातडीने एकमेकांशी संवाद साधला. क्षणाचाही विलंब न लावता केवळ मानवतावादी दृष्टिकोन ठेवून त्यांनी या मदतीचा निर्णय घेतला. हा निर्णय केवळ आपत्कालीन परिस्थितीत माणुसकीच्या नात्याने घेण्यात आला असून तातडीने उच्च न्यायालयाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे.
साईंच्या दरबारातून मदत
साई संस्थानचा हा निर्णय केवळ आर्थिक मदत नाही, तर तो ‘श्रद्धा आणि सबुरी’चा वसा जपणारा माणुसकीचा आणि महाराष्ट्रावरील संकटात सर्व शक्तीनिशी उभं राहण्याचा एक ज्वलंत आदर्श आहे. संकटात सापडलेल्या महाराष्ट्राला साईंच्या दरबारातून मिळालेला हा आधार पीडितांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यास नक्कीच मदत करेल.