दुबई : 2025 च्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तानचा पराभव केला. सूर्या ब्रिगेडनं 5 विकेट्सनं विजय मिळवत नवव्यांदा आशिया चषकावर नाव कोरलं. मात्र या सामन्यानंतर पाकिस्तानी कर्णधार सलमान अलीनं एक मोठी घोषणा केली, सलमान अली आघाच्या विधानावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कारण त्यानं सांगितलं की तो आशिया कपमधून मिळालेले पैसे भारतीय हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पाकिस्तानी नागरिकांना आणि मुलांना दान करतील. यावरुन पाकिस्तानी क्रिकेट संघ दहशतवाद्यांना पाठिंबा देत आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नेमकं काय म्हणाला पाकिस्तानी कर्णधार :
28 सप्टेंबर रोजी आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात झालेल्या पराभवानंतर पत्रकार परिषदेत बोलताना सलमान अली आघा म्हणाला, “आम्ही (संपूर्ण संघ) आमची संपूर्ण मॅच फी अलीकडील भारतीय हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व नागरिक आणि मुलांना दान करु इच्छितो.” आघाच्या विधानानं प्रश्न उपस्थित केले आहेत, कारण त्याचा थेट अर्थ असा आहे की पाकिस्तानी क्रिकेट संघ दहशतवाद्यांच्या पाठीशी उभा आहे. खरं तर, पहलगाममधील दहशतवादी हल्ला झाल्यानंतर, भारतानं ऑपरेशन सिंदूर सुरु केलं, ज्यात सुमारे 100 दहशतवादी मारले गेले. याचा अर्थ एक गोष्ट स्पष्ट आहे, पाकिस्तान संघ दहशतवादी कुटुंबांना मदत करण्याचा मानस बाळगतो.
पराभवाबद्दल काय म्हणाला सलमान अली आघा :
आशिया कपच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर सलमान अली आघानं आपलं मौन सोडलं. त्यानं सांगितलं की हा पराभव पाकिस्तानी संघासाठी कठीण असेल. त्यानं मान्य केलं की त्यांनी फलंदाजीत कमी कामगिरी केली आणि त्यांना फक्त त्यांच्या गोलंदाजीनं पाठिंबा दिला. सलमाननं मान्य केलं की संघानं कठोर परिश्रम केले, परंतु थोडी चांगली कामगिरी केल्यास निकाल बदलू शकला असता. त्यांनी संघाच्या वारंवार विकेट गमावल्याचा उल्लेख केला आणि भारतीय संघानं चांगलं खेळ केल्याचं मान्य केलं.
आशिया कप जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादव काय म्हणाला? :
तसंच सामन्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, “मी वैयक्तिकरित्या या स्पर्धेसाठी (सर्व सामने) माझी संपूर्ण मॅच फी भारतीय सैन्याला दान करु इच्छितो.” भारताला आशिया कप ट्रॉफी न मिळाल्याबद्दल सूर्यानंही प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “आम्ही एक संघ म्हणून निर्णय घेतला होता की आम्ही (मोहसिन नक्वीकडून) ट्रॉफी स्वीकारणार नाही. कोणीही आम्हाला तसं करण्यास सांगितलं नाही, परंतु मला वाटतं की स्पर्धा जिंकणारा संघ ट्रॉफीला पात्र आहे.” सामन्यानंतर मोहसिन नक्वी यांनी ट्रॉफी आणि पदकं सोबत घेतली, ज्यामुळं बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी त्यांना फटकारलं.