नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला शांतता करारास सहमती देण्यासाठी रविवारी 5 ऑक्टोबर ही अंतिम मुदत दिली होती. ट्रम्प यांनी म्हटलं होतं की, जर हमास या अंतिम मुदतीत सहमत झाला नाही, तर त्यांना अभूतपूर्व कारवाईला सामोरं जावं लागेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये हा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर हमासनं त्यांचा आदेश स्वीकारला असून, इस्रायली बंधकांना सोडण्यास सहमती दर्शविली आहे. दरम्यान, इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही त्यांच्या कारवाया थांबवण्याचे आदेश दिले आहेत. नेतान्याहू यांनी सांगितलं की, इस्रायल ट्रम्प यांच्या योजनेचा पहिला टप्पा अंमलात आणण्यास तयार आहे.
पंतप्रधान मोदींनी शेअर केली पोस्ट :
अशातच भारत-अमेरिका यांच्यातील ताणलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुद्द्यावर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या कृतीचं कौतुक केलं आहे. त्यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे की, बंधकांच्या सुटकेचा संकेत हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाचं स्वागत करतो, कारण गाझामधील शांतता प्रयत्न योग्य दिशेनं जात आहेत. भारत कायमस्वरूपी आणि न्याय्य शांततेच्या दिशेने सर्व प्रयत्नांना नेहमीच पाठिंबा देणार आहे.
ट्रम्प यांच्या भूमिकेचं यापूर्वी स्वागत करण्यात आलं होतं :
पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वीही डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या इस्रायल-गाझा युद्धाच्या समाप्तीच्या योजनेचं स्वागत केलं होतं. ट्रम्प यांची योजना पॅलेस्टिनी आणि इस्रायली नागरिकांसाठी दीर्घकालीन आणि चिरस्थायी शांततेचा मार्ग मोकळा करते.
ऑस्ट्रेलियानंही व्यक्त केला पाठिंबा :
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनीही या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी ट्रम्प यांच्या योजनेचं समर्थन केलं आहे. ऑस्ट्रेलिया अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या योजनेचं स्वागत करतो. हमासनं विलंब न करता आपली शस्त्रं सोडून द्यावीत आणि सर्व ओलिसांना सोडावं. युद्ध संपवण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलिया आपल्या मित्र राष्ट्रांसोबत केलेल्या प्रयत्नांना पाठिंबा देत राहील, असंही ते म्हणालेत.