गेल्या काही दिवसांपासून खोकल्याच्या औषधावरून प्रचंड वातावरण तापलेलं आहे. काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेश आणि राजस्थान येथील 19 बालकांचा कफ सिरफ पिल्यामुळे मृत्यू झाला होता. या घटनेनंतर महाराष्ट्रातील प्रशासन सतर्क झाले असून बऱ्याच ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार आज पुण्यात अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.
राज्यातील अन्न व औषध प्रशासनाने खोकल्यावरील औषधांची निर्मिती करणाऱ्या सर्व कंपन्यांची कसून तपासणी सुरू केली असून मेडिकल स्टोअर्स आणि सरकारी रुग्णालयांमधून खोकल्याच्या औषधांचे नमुने देखील तपासणीसाठी गोळा करण्यात आले असल्याची माहिती अन्न व औषध विभागाने दिली आहे. विविध शहरांसह रेडनेक्स फार्मसिटीकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने उत्पादित केलेल्या खोकल्यावरील ‘रेसपिफ्रेश टी आर’ या औषधाचा मोठा साठा पुण्यातून जप्त करण्यात आला आहे.
मध्य प्रदेशात ज्या औषधाच्या सेवनाने मुले दगावल्याचा संशय आहे, त्या औषधाचा साठा सध्या महाराष्ट्र राज्यात उपलब्ध नसल्याने चिंतेचे कारण नाही, दरम्यान दोन वर्षांखालील लहान मुलांना कोणत्याही प्रकारचे कफ सिरप किंवा खोकल्याचे औषध दिले जाऊ नये, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने दिले असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त गिरीश हुकरे यांनी दिले आहे. ते म्हणाले कि, पालकांनी आणि डॉक्टरांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. सध्या अन्न व औषध प्रशासनाची ही मोहीम राज्यभर सुरू असून, खोकल्याच्या औषधांच्या गुणवत्तेवर आणि सुरक्षेवर विशेष लक्ष दिले जात आहे.
अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स (AAP) आणि US FDA ने दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षांखालील मुलांना हे औषध देऊ नये. या औषधामुळे श्वसनाचा त्रास, जास्त झोप, चक्कर, फिट्स आणि मृत्यूचाही धोका उद्भवतो. मिळालेल्या काही रिपोर्टनुसार दोन वर्षांखालील मुलांना हे औषध अजिबात देऊ नये. आणि 2 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांना मर्यादित प्रमाणातच हे औषध द्यावे.