विशाखापट्टणम : आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या तिसऱ्या लीग स्टेज सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेशी सामना करणार आहे. श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध सलग विजय मिळवल्यानंतर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेशी सामना करण्यासाठी सज्ज आहे. या सामन्यातील विजयामुळं आठ संघांच्या स्पर्धेत भारताचं गुणतालिकेत अव्वल स्थान निश्चित होईल. भारतीय संघासाठी सर्वात मोठी चिंता म्हणजे त्यांच्या टॉप ऑर्डरची निराशाजनक कामगिरी. गेल्या दोन सामन्यांमध्ये खराब कामगिरी करणाऱ्या सलामीवीर स्मृती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्याकडून या सामन्यात मोठ्या कामगिरीची अपेक्षा असेल.
दोन्ही संघांमध्ये विक्रम कसा :
आतापर्यंत टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघांमध्ये 33 वनडे सामने खेळले गेले आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघानं यापैकी 20 सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 12 सामने जिंकले आहेत. भारतीय महिला संघानं या दोन्ही संघांमध्ये खेळलेले शेवटचे पाच सामने जिंकले आहेत. या स्पर्धेत, टीम इंडियानं त्यांचे दोन्ही सामने जिंकले असले तरी, दक्षिण आफ्रिकेनं एक जिंकला आहे आणि एक गमावला आहे.
भारतीय महिला संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर :
2025 च्या महिला विश्वचषकासाठी भारतीय महिला संघ पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. संघानं आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत, त्यापैकी दोन जिंकले आहेत. चार गुणांसह, त्यांचा नेट रन रेट +1.515 आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा संघ पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेनं दोन सामने खेळले आहेत, एक जिंकला आहे आणि एक गमावला आहे. दोन गुणांसह, त्यांचा नेट रन रेट +1.402 आहे.
पावसामुळं खेळात व्यत्यय येण्याची शक्यता :
अॅक्यूवेदरच्या वृत्तानुसार आज 9 ऑक्टोबर रोजी विशाखापट्टणममध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिवसा 75 टक्क्यांपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच जोरदार वारे आणि ढगाळ वातावरण देखील अपेक्षित आहे. तर रात्री वारे तीव्र होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळं सामना होण्याची शक्यता कमी दिसते. जर पावसामुळं सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल.
सामना कधी आणि कुठं पाहायचा : 2025 च्या आयसीसी महिला वनडे विश्वचषकातील 10 वा सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. सामना दुपारी 3:00 वाजता सुरु होईल. चाहते स्टार स्पोर्ट्सवर सामना थेट पाहू शकतात. फ्री-टू-एअर चाहते जिओहॉटस्टारवर सामना आनंद घेऊ शकतात. वेबसाइटवर देखील सामना विनामूल्य पाहता येईल.
सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग 11 :
भारतीय संघ : प्रतिका रावल, स्मृती मंधाना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), स्नेह राणा, अमनजोत कौर, क्रांती गौर, रेणुका सिंग ठाकूर.
दक्षिण आफ्रिका संघ : लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, स्युने लुस, मारिझान कॅप, अनेके बॉश, सिनालो जाफ्ता (यष्टीरक्षक), क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लार्क, मसाबता क्लास, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा.