मुंबई : भारताच्या दौऱ्यावर असलेले ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत भेट घेतली. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी सांगितलं की, दोन्ही देशांमधील संबंधांचा पाया लोकशाहीवर आहे. दोन्ही देशांमधील करारामुळं रोजगार वाढेल. दोन्ही नेत्यांनी व्हिजन 2035 रोडमॅप अंतर्गत भारत-ब्रिटन व्यापक धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर चर्चा केली. पंतप्रधान मोदी आणि स्टारमर सीईओ फोरम आणि ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 मध्ये देखील सहभागी होतील.
पीएम मोदी काय म्हणाले? :
ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांच्यासोबतच्या संयुक्त निवेदनात पंतप्रधान मोदी म्हणाले, “हा करार (व्यापक आर्थिक आणि व्यापार करार) दोन्ही देशांमधील आयात खर्च कमी करेल, तरुणांसाठी नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करेल, व्यापार वाढवेल आणि आपल्या उद्योगांना आणि ग्राहकांना फायदा होईल. करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर काही महिन्यांतच तुमचा भारत दौरा, आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या व्यावसायिक प्रतिनिधी मंडळासह, भारत-ब्रिटन भागीदारीतील नव्या जोमाचं प्रतीक आहे.” तसंच पंतप्रधान स्टारमर यांच्या नेतृत्वाखाली भारत-ब्रिटन संबंधांमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. या वर्षी जुलैमध्ये, माझ्या यूके भेटीदरम्यान, आम्ही ऐतिहासिक व्यापक आर्थिक आणि व्यापार करार (CETA) वर स्वाक्षरी केल्याचंही मोदींनी सांगितलं. “काल, भारत आणि यूकेमधील व्यावसायिक नेत्यांची सर्वात मोठी शिखर परिषद झाली. आज, आम्ही भारत-यूके सीईओ फोरम आणि ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलला संबोधित करणार आहोत. हे सर्व भारत-यूके सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी सूचना आणि संधी प्रदान करेल,” असंही मोदी म्हणाले.
भविष्यावर लक्ष केंद्रित करुन भागीदारी निर्माण करु :
पंतप्रधान मोदींसोबतच्या संयुक्त निवेदनात, ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर म्हणाले, “पंतप्रधान मोदी, जुलैमध्ये तुमचं युकेमध्ये स्वागत करणं हा एक सन्मान होता आणि काही महिन्यांनंतरच ही परतीची भेट घेताना मला आनंद होत आहे. आम्ही इथं काहीतरी बांधत आहोत; आम्ही भविष्यावर लक्ष केंद्रित करुन संधी मिळवणारी एक नवीन, आधुनिक भागीदारी तयार करत आहोत आणि आम्ही ते एकत्र करत आहोत. म्हणूनच आम्ही जुलैमध्ये युके-भारत व्यापक आर्थिक आणि व्यापार करार (CETA) वर स्वाक्षरी केली, जी एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. वर्षानुवर्षे कठोर परिश्रम, शुल्क कमी करणं, एकमेकांच्या बाजारपेठांमध्ये प्रवेश वाढवणं, विकासाला चालना देणं, आपल्या लोकांसाठी रोजगार निर्माण करणं आणि दोन्ही देशांमधील जीवनमान सुधारणं. कराराच्या पानावरील शब्दांपलीकडे, आपल्या दोन महान देशांना एकत्र अधिक जवळून काम करण्याचा आत्मविश्वास देणारा हा विश्वास आम्ही या भेटीदरम्यान पाहिला आहे.”
युके आणि भारत यांच्यात मोठा व्यापार :
युके आणि भारत यांच्यात एक मोठा व्यापार करार झाला आहे. ब्रिटिश पंतप्रधान म्हणाले, “आम्ही जुलैमध्ये भारतासोबत एक मोठा व्यापार करार केला, जो कोणत्याही देशानं स्वाक्षरी केलेला सर्वोत्तम करार आहे, परंतु कथा तिथंच संपत नाही. हा फक्त कागदाचा तुकडा नाही; तो विकासासाठी एक प्रक्षेपण केंद्र आहे. भारत 2028 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यास सज्ज आहे आणि त्याच्यासोबत व्यापार जलद आणि स्वस्त होईल, त्यामुळं निर्माण होणाऱ्या संधी अतुलनीय आहेत.”