नवी दिल्ली : पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या अकासा एअरच्या विमानाला शुक्रवारी एका पक्ष्यानं धडक दिली. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि विमान सुरक्षितपणे राजधानी दिल्लीत उतरलं. या घटनेबाबत एअरलाइनच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, अभियांत्रिकी पथकाकडून विमानाची तपासणी केली जात आहे आणि सखोल तपासणी केल्यानंतर ते विमान पुन्हा प्रवाशांच्या सेवेसाठी सोडलं जाईल.
विमान आणि सर्व प्रवासी सुरक्षित :
प्रवक्त्यानं सांगितलं की, 10 ऑक्टोबर 2025 रोजी पुण्याहून दिल्लीला जाणारं अकासा एअरचे विमान QP 1607 ला पक्ष्यानं धडक दिली. अशा स्थितीतही विमान सुरक्षितपणे उतरलं. सर्व प्रवासी आणि कर्मचारीदेखील सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे. विमानातील प्रवाशांची संख्या जाहीर करण्यात आलेली नाही. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट्सवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, बोईंग 737 मॅक्स 8 या विमानाद्वारे ही उड्डाण सेवा दिली जात होती आणि हे विमान शुक्रवारी सकाळी 10 वाजता राष्ट्रीय राजधानीत उतरलं.
वैमानिकानं अत्यंत सतर्कतेनं विमान लँड केलं :
ज्या विमानाला पक्षी धडकला होता, ते विमान दिल्लीहून गोव्याकडे जाणार होतं. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव ही सेवा काही तासांसाठी थांबवण्यात आली आणि नंतर या मार्गावर दुसऱ्या विमानाद्वारे उड्डाण करण्यात आलं. उपलब्ध माहितीनुसार, अकासा एअरची ही फ्लाइट ठरलेल्या वेळेनुसार दिल्लीत पोहोचली होती आणि वैमानिकानं अत्यंत सतर्कतेनं विमान रन वेवर उतरवलं.
पक्षी धडकण्याच्या घटना प्रामुख्यानं टेकऑफ किंवा लँडिंग दरम्यानच घडतात, जेव्हा विमान कमी उंचीवर असते. नागरी विमान वाहतूक तज्ज्ञांच्या मते, आधुनिक विमानांमध्ये मजबूत सुरक्षा प्रणाली असते, तरीसुद्धा अशा प्रकरणांमध्ये कोणताही धोका टाळण्यासाठी विमानाची संपूर्ण तपासणी करणे आवश्यक असते.