नवी दिल्ली – भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघातील दुसरा कसोटी सामना दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाच्या फलंदाजांनी शानदार कामगिरी केली आहे. शुभमन गिलनं 129 धावा केल्या, तर यशस्वी जैस्वालनं 175 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या साई सुदर्शननं 87 धावा केल्या. या खेळाडूंमुळंच भारतीय संघानं 518 धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. वेस्ट इंडिजचे गोलंदाज पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आणि त्यांना चांगली कामगिरी करता आली नाही. प्रत्युत्तरात, दुसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर वेस्ट इंडिजनं पहिल्या डावात 4 गडी गमावून 140 धावा केल्या होत्या. शाई होप 31 धावांसह आणि टेव्हलिन एमॅच 14 धावांसह खेळत आहेत. वेस्ट इंडिज अजूनही 378 धावांनी पिछाडीवर आहे.
वेस्ट इंडिजची निराशजनक सुरुवात –
तिसऱ्या दिवशी खेळताना वेस्ट इंडिजकडून शाई होप आणि टेविन इमलाच डावाची सुरुवात करतील. होप 31 धावांवर फलंदाजी करत आहे, तर टेविन इमलाच 14 धावांवर आहेत. भारताच्या 518 धावांच्या उत्तरात फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजची सुरुवात निराशाजनक झाली. संघानं त्यांचा पहिला बळी फक्त 21 धावांवर गमावला. मात्र पहिल्या विकेटनंतर, तेगनारायण चंद्रपॉल आणि अॅलिक अथानाझे यांनी 66 धावांची भागीदारी करुन संघाचा धावसंख्या 100 च्या जवळ आणली.
शाय होपनंही दाखवली आपली ताकद – वेस्ट इंडिजकडून शाय होपनं फलंदाजीत आपली ताकद दाखवली. त्यानं फिरकी हल्ल्याविरुद्ध काही प्रभावी फटके खेळण्यासाठी आपल्या अनुभवाचा वापर केला. वेस्ट इंडिजकडून अथानाझेनं 84 चेंडूत 41 धावा केल्या. चंद्रपॉलनंही 67 चेंडूत 34 धावांचं योगदान दिलं. संघाचा कर्णधार रोस्टन चेस नाबाद राहिला.
जडेजान घेतल्या सर्वाधिक विकेट –
गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर, दिवसाच्या खेळाच्या शेवटी रवींद्र जडेजानं टीम इंडियाकडून सर्वाधिक बळी घेतले. जडेजानं 14 षटकांत 37 धावा देत 3 बळी घेतले. कुलदीप यादवनंही एक बळी घेतला. जलद गोलंदाजी विभागात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजलाही विकेट मिळाली नाही. वॉशिंग्टन सुंदरलाही डावात विकेट मिळाली नाही.
भारताकडून शुभमन गिल आणि यशस्वी यांचं शतक –
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाची फलंदाजी उत्कृष्ट होती. केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली. डावाची सुरुवात करणाऱ्या केएल राहुलला फक्त 28 धावा करता आल्या. साई सुदर्शननंही 87 धावांची दमदार खेळी केली, तर नितीश कुमार रेड्डी यांनी 43 आणि ध्रुव जुरेल यांनी 44 धावा केल्या. भारतीय डावातील मुख्य आकर्षण म्हणजे यशस्वी आणि शुभमन गिल यांचं शतक. यशस्वी जैस्वालनं 258 चेंडूंत 22 चौकारांसह 175 धावा केल्या. शुभमन गिल 129 धावांवर नाबाद राहिला. दुर्दैवानं, यशस्वीला त्याचं द्विशतक गाठता आलं नाही. कर्णधार शुभमन गिलसोबत झालेल्या गैरसमजामुळं तो धावबाद झाला.