नवी दिल्ली : शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघानं दिल्ली कसोटीच्या पाचव्या दिवशी वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा सामना जिंकला. यासह, टीम इंडियानं मालिका 2-0 अशी सहज जिंकली. सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताला फक्त 58 धावांची आवश्यकता होती आणि नऊ विकेट्स शिल्लक होत्या. साई सुदर्शन आणि शुभमन गिलच्या रुपात भारतीय संघाला दोन धक्के सहन करावे लागले. मात्र केएल राहुलनं एका टोकाला धरून संघाला आणखी एक सहज विजय मिळवून दिला. हा विजय देखील खास आहे कारण आज टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा वाढदिवस आहे आणि भारतीय संघ प्रशिक्षकांना त्यांच्या खास दिवशी विजयापेक्षा मोठी भेट देऊ शकला नसता.
अंतिम दिवशी फक्त 58 धावांची आवश्यकता :
121 धावांचा पाठलाग करताना, टीम इंडियानं चौथ्या दिवसाच्या अखेरीस एक विकेट गमावून 63 धावा केल्या होत्या. चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात यशस्वी जैस्वाल (8) च्या रूपात भारताला मोठा धक्का बसला. मात्र टीम इंडियानं त्यानंतर चौथ्या दिवसाचा शेवट 1 बाद 63 धावांवर केला. दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात केएल राहुलच्या नाबाद 58 धावांच्या खेळीमुळं भारताला लक्ष्याचा पाठलाग करण्यास मदत झाली. पाचव्या दिवशी भारतानं साई सुदर्शन (39) आणि शुभमन गिल (13) यांचे बळी गमावले, परंतु वेस्ट इंडिजला पुन्हा सामन्यात आणण्यासाठी ते पुरेसे नव्हते.
हे ही वाचा : दिल्ली कसोटीत कॅरोबियन फलंदाजांनी रचला इतिहास; 12 वर्षांनंतर झाली इतिहासाची पुनरावृत्ती
पहिल्या डावात भारताच्या 518 धावा :
या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत भारतानं 5 बाद 518 धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. सलामीवीर यशस्वी जैस्वालनं 175 धावा केल्या, तर कर्णधार शुभमन गिलनं नाबाद 129 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून जोमेल वॉरिकननं सर्वाधिक तीन बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल, वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात केवळ 248 धावांवर बाद झाला. या डावात अॅलिक अथानासेनं सर्वाधिक 41 धावा केल्या, तर शाई होपनं 36 धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादवनं सर्वाधिक 5 बळी घेतले. रवींद्र जडेजानं 3 बळी घेतले.
India completes a clean sweep in Delhi.
Scorecard: https://t.co/1B9MbKg7yq pic.twitter.com/V6l524lWJa
— ICC (@ICC) October 14, 2025
पहिल्या डावात 270 धावांची आघाडी :
पहिल्या डावाच्या आधारे भारताकडे 270 धावांची आघाडी होती. यानंतर फॉलोऑन मिळालेल्या वेस्ट इंडिजनं दुसऱ्या डावात 390 धावा केल्या, ज्यामुळं भारतासमोर विजयासाठी 121 धावांचं लक्ष्य होतं. वेस्ट इंडिजचा दुसरा डाव सुरुवातीला पुन्हा एकदा डळमळीत झाला, परंतु सलामीवीर जॉन कॅम्पबेलनं शाई होपसह तिसऱ्या विकेटसाठी 177 धावांची भागीदारी करून संघाला सावरलं.
कॅम्पबेल आणि होपचं शतक :
कॅम्पबेल 115 धावांवर बाद झाला, तर शाई होपनं 103 धावा केल्या. याशिवाय, जस्टिन ग्रीव्हजनं 50 धावा केल्या. कर्णधार रोस्टन चेसनं संघाच्या खात्यात 40 धावांचं योगदान दिले. भारताकडून कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराहनं प्रत्येकी तीन, तर मोहम्मद सिराजनं दोन बळी घेतले. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी एक बळी घेतला.