नवी दिल्ली : दिल्लीसह बहुतेक राज्यांमध्ये दिवाळीत पाऊस पडणार नाही. मात्र सौम्य थंडी पडण्याची शक्यता आहे. तर गुजरातसह काही राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशाच्या बहुतेक भागातून मान्सून मागे हटला असला तरी दिवाळीत काही राज्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गुजरातमध्ये दिवाळीत पाऊस पडण्याची शक्यता :
हवामान विभागाच्या मते, दिवाळी आणि गुजराती नववर्षाच्या आसपास गुजरातच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीनं सांगितले की 20, 21 आणि 22 ऑक्टोबर रोजी डांग, नवसारी आणि वलसाडसह दक्षिण गुजरात जिल्ह्यांमध्ये गडगडाटी वादळासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर उर्वरित राज्यात कोरडं हवामान राहण्याची अपेक्षा आहे. डांग, नवसारी आणि वलसाड तालुक्यात गुरुवारी हलका पाऊस पडला.
दिवाळीत अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा :
हवामान विभागानं सांगितलं की केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये पुढील सात दिवसांत गडगडाटी वादळासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 18 ते 23 तारखेदरम्यान तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल, केरळ, माहे, दक्षिण अंतर्गत कर्नाटक इथं हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात ताशी 30-40 किमी वेगानं वारे वाहतील. 20 आणि 21 ऑक्टोबर रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
दुसरीकडे, 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी ओडिशामध्ये पाऊस पडू शकतो. तसंच 18 ते 21 ऑक्टोबर दरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडेल. दिवाळीदरम्यान या राज्यांमध्ये पाऊस सणाची मजा खराब करू शकतो.