India vs Australia rain rule ICC final : महिला वनडे विश्वचषक 2025 साठी उपांत्य फेरीचे संघ निश्चित झाले आहे. सेमीफायनलमध्ये भारताचा सामना स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ ऑस्ट्रेलियाशी होईल. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येणारा हा स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना असेल. मात्र याच मैदानावर 26 ऑक्टोबर रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यातील गट फेरीचा शेवटचा सामना पावसामुळं रद्द झाला होता. गट फेरीतील तो सामना पावसामुळं रद्द झाला तरीही भारतीय संघाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या शक्यतेवर परिणाम झाला नाही. पण जर उपांत्य फेरीतही पाऊस पडला तर काय कोणता संघ फायनल खेळेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पावसाची दाट शक्यता :
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरुवारी नवी मुंबईत होणाऱ्या सामन्यातही पावसाची दाट शक्यता आहे. हवामान अंदाजानुसार, या दिवशी नवी मुंबईत पावसाचा अंदाज 65 टक्के आहे. उपांत्य सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरु होणार आहे. मात्र दुपारीच पावसाची दाट शक्यता आहे. जरी गुरुवारीचा सामना पावसानं वाया घालवला तरी घाबरुन जाण्याची गरज नाही. कारण आयसीसीनं या सामन्यासाठी राखीव दिवस देखील निश्चित केला आहे. जर पावसामुळं किंवा इतर कोणत्याही कारणामुळं, 30 ऑक्टोबर रोजी किमान 20 षटकांचा फॉर्मेट शक्य नसेल, तर सामना राखीव दिवशी (31 ऑक्टोबर) हलवला जाईल.
कोण खेळणार फायनल :
राखीव दिवशी सामना जिथं संपला होता तिथून पुन्हा सुरु होईल. एकदा टॉस झाला की, सामना लाईव्ह मानला जाईल. परंतु समस्या अशी आहे की शुक्रवारी (31 ऑक्टोबर) नवी मुंबईतही पावसाचा अंदाज आहे. 31 ऑक्टोबर रोजी पावसाचा अंदाज ९० टक्के आहे, म्हणजेच मुसळधार पावसाची शक्यता आहे. आता प्रश्न असा आहे की जर राखीव दिवशी सामना झाला नाही, तर कोणता संघ अंतिम फेरीत पोहोचेल? या परिस्थितीत, ऑस्ट्रेलियन संघ अंतिम फेरीत पोहोचेल कारण ते गुणतालिकेत भारतापेक्षा वरच्या स्थानावर होते. ऑस्ट्रेलियानं लीग टप्प्यात सातपैकी सहा सामने जिंकले, तर त्यांचा एक सामना (श्रीलंकेविरुद्ध) पावसामुळं रद्द झाला.
भारतीय संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर (India vs Australia rain rule ICC final)
दुसरीकडे भारतीय संघानं तीन सामने जिंकले, तीन गमावले आणि एक सामना अनिर्णित राहिला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर राहिला. याचा अर्थ असा की जर उपांत्य सामना पावसामुळं रद्द झाला, तर ऑस्ट्रेलियन संघ त्यांच्या वरिष्ठ लीग रँकिंगच्या आधारे अंतिम फेरीत पोहोचेल. त्याचप्रमाणे, बुधवार, 29 ऑक्टोबर रोजी गुवाहाटी इथं दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. जर तो सामना देखील पावसामुळं रद्द झाला, तर इंग्लंड अंतिम फेरीत खेळेल, कारण ते गुणतालिकेत दक्षिण आफ्रिकेपेक्षा दुसऱ्या स्थानावर होते.












