India vs Australia semi final : महिला वनडे विश्वचषक 2025 चा दुसरा उपांत्य सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघामध्ये डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात आला. भारतानं हा रोमांचक सामना 5 विकेट्सनं जिंकला आणि तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवलं. महिला एकदिवसीय विश्वचषकातील हा भारताचा पाचवा उपांत्य सामना होता.
फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार :
या सामन्यात भारतासमोर 339 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. प्रत्युत्तरात, जेमिमा रॉड्रिग्जच्या शानदार शतकाच्या जोरावर टीम इंडियानं 48.3 षटकांत हे लक्ष्य सहज गाठलं. आता 2 नोव्हेंबर रोजी अंतिम सामन्यात भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल. महिला वनडे क्रिकेट इतिहासातील हा सर्वाधिक धावांचा पाठलाग आहे. यापूर्वी, महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा पाठलाग 330 धावांचा होता, जो ऑस्ट्रेलियन महिला संघानं या वर्षाच्या सुरुवातीला भारताविरुद्ध केला होता. जेमिमा रॉड्रिग्जची 127 धावांची ऐतिहासिक सामना जिंकणारी खेळी पाहायला मिळाली.
हे हि वाचा : दक्षिण आफ्रिका प्रथमच वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये; बलाढ्य इंग्लंडला 125 धावांनी नमवलं
ऑस्ट्रेलियाकडून फोबी लिचफिल्डचं शानदार शतक (India vs Australia semi final)
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि संघ 49.5 षटकांत 338 धावांवर सर्वबाद झाला. भारताविरुद्धच्या उपांत्य सामन्यात, लिचफिल्डनं ऑस्ट्रेलियाकडून शानदार फलंदाजी केली आणि शतक झळकावलं. लिचफिल्ड आणि पेरी क्रीजवर असताना, ऑस्ट्रेलिया 350 च्या वर पोहोचेल असं वाटत होतं, परंतु अमनजोतनं लिचफिल्डला बाद करून 155 धावांची भागीदारी मोडली. लिचफिल्ड 93 चेंडूत 119 धावा करून बाद झाली. त्यानंतर पेरीनं 77 धावा काढत संघाची सूत्रे हाती घेतली. टहलिया मॅकग्रा सामन्यात फारसं काही करू शकली नाही, ती 12 धावांवर धावबाद झाली. मात्र, ॲशले गार्डनरनं अखेर जलद खेळी करत ऑस्ट्रेलियाला 300 धावांच्या पुढं नेलं. गार्डनर 63 धावांवर धावबाद झाली. या सामन्यात भारताकडून श्री चरण आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर अमनजोत कौर, क्रांती गौर आणि राधा यादव यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
India will meet South Africa in the #CWC25 Final 🤩🇮🇳 pic.twitter.com/Q0SALrqKgX
— ICC (@ICC) October 30, 2025
भारताकडून जेमिमा रॉड्रिग्जची सामना जिंकून देणारी खेळी :
लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला चांगली सुरुवात मिळाली नाही. दीर्घ अनुपस्थितीनंतर संघात परतलेली शफाली वर्मा 5 चेंडूत 10 धावा काढून बाद झाली. त्यानंतर भारताला आणखी एक धक्का स्मृती मंधानाच्या रूपात बसला, जी 24 चेंडूत 24 धावा काढून बाद झाली. त्यानंतर हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्जने तिसऱ्या विकेटसाठी 167 धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरला. सामन्यात हरमनप्रीत 89 धावा काढून बाद झाली. त्यानंतर दीप्ती शर्मा 17 चेंडूत 24 धावा काढून बाद झाली. उर्वरित कामगिरी जेमिमा रॉड्रिग्ज आणि रिचा घोष यांनी केली. या सामन्यात भारताकडून जेमिमा रॉड्रिग्जनं सामना जिंकून देणारी खेळी केली.












