Pune Gangwar : पुण्यात पुन्हा गुन्हेगारी क्षेत्रातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात ‘गँगवार’ पुन्हा सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला म्हणून त्यांच्या प्रतिस्पर्धी टोळीने आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावाची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली आहे. कोंढवा परिसरात घडलेल्या या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा खून म्हणजे थेट ‘गँगवॉर’ची सुरुवात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
आज (शनिवार, 1 नोव्हेंबर) रोजी दुपारी कोंढव्यात मुळशी पॅटर्नचा थरार पहायला मिळाला. भररस्त्यात रिक्षा चालकावर गोळीबार आणि कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. गणेश काळे नावाच्या व्यक्तीवर हा हल्ला करण्यात आला आहे. गणेश काळे या गोळीबारात जागीच ठार झाला आहे. गणेश काळे हा आंदेकर टोळीच्या दत्ता काळे याचा भाऊ असल्याची प्राथिमक माहिती समोर येत आहे.
हे ही वाचा – रोहित आर्याने A Wednesday हा चित्रपट बघून केला होता कट; चार मुलांना जाळून टाकण्याच्या देखील होता प्रयत्नात
हल्ल्यात गणेश काळे याचा जागीच मृत्यू
गणेश हा आपल्या रिक्षातून जात असताना, दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्याच्यावर पिस्तूलातून गोळ्या झाडल्या, तसेच कोयत्याने वार केले. या हल्ल्यात गणेश काळे याचा जागीच मृत्यू झाला.
आंदेकर खून प्रकरणात पिस्तूले मृताच्या भावाने आणली होती..
माजी नगरसेवक आणि कुख्यात गुंड वनराज आंदेकर यांची हत्या गेल्यावर्षी करण्यात आली होती. सोमनाथ गायकवाड टोळीने गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करत त्यांचा खून केला होता. या आंदेकर खून प्रकरणात वापरलेली पिस्तूले आरोपी समीर काळे याने मध्य प्रदेशातून आणली असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते. खून झालेला गणेश काळे हा समीर काळे याचा भाऊ आहे. समीर हा सोमा गायकवाड टोळीतील सदस्य आहे.
या हत्येला ‘टोळी युद्धा’ची किनार
गणेश काळे याचा खून हा त्याच जुन्या वैमनस्यातून म्हणजेच वनराज आंदेकरच्या खुनाचा थेट बदला घेण्यासाठी करण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. त्यामुळे या हत्येला ‘टोळी युद्धा’ची किनार आहे.












