सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे काहीतरी चवदार आणि उष्णतावर्धक खाद्यपदार्थ खाण्याची इच्छा झाली आणि आरोग्याच्या भीतीने खात नसाल तर आम्ही खास तुमच्यासाठी पर्याय शोधला आहे. हिवाळ्यात खाण्यासारखे असे काही घरगुती लाडूचे प्रकार आहेत. ज्यामुळे तुम्हाला चवही मस्त लागेल आणि आरोग्यही जबरदस्त राहणार आहे. यासाठी तुम्हाला काजू बदाम लाडू, डिंकाचे लाडू आणि तीळाचे लाडू हे उत्तम पर्याय आहे. हे लाडू तुम्हाला हिवाळ्यात उष्णता देतील आणि ऊर्जा वाढवतील.
हिवाळ्यात थंडीमुळे सर्दी, खोकला यांसारख्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. त्यामुळे शरीराला उब मिळेल असं काहीतरी खाणं महत्त्वाचं आहे. काजू बदाम, डिंक आणि तीळाचे लाडू हे हिवाळ्यात उत्तम पर्याय आहेत. हे लाडू शरीराला उष्णता देतात आणि ऊर्जा वाढवतात. डिंकामध्ये भरपूर कॅल्शिअम आणि प्रथिने असतात, ज्यामुळे हाडे मजबूत राहतात आणि शरीरात उष्णता तयार होऊन उब मिळते. भाजलेल्या डिंकात गूळ, मनुका आणि बदाम मिसळल्यावर लाडू अधिक उष्णतावर्धक होतात.
तीळात कॅल्शियम, लोह आणि प्रोटीन
तीळात कॅल्शियम, लोह आणि प्रोटीन असतात. ते हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवतात आणि त्वचेचं आरोग्य सुधारतात. मेथीचे लाडू शरीराला उब देतात आणि पाठदुखी, सांधेदुखीपासून आराम देतात. ते वजन कमी करण्यास आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. हे लाडू हिवाळ्यात शरीराला ऊर्जा, उब आणि चव देतात म्हणजेच टेस्ट आणि हेल्थ दोन्हींचा संगम.
गुळामध्ये कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम ही जीवनसत्वे
गुळात भरपूर प्रमाणात कॅलरी असतात. गोड पदार्थ व कॅफिनयुक्त पेयांमध्ये गुळाचा वापर करुन त्याचे सेवन केले जाऊ शकते. साथीच्या रोगांपासून बचाव करण्यासाठी गुळ लाभदायक ठरतो. थंडीच्या दिवसांत शरिरातील रक्तप्रवाहाची गती मंदावते. ज्यामुळे रक्तदाबासारखे आजार उद्भवतात. ज्या लोकांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असते अशा लोकांनी गुळाचे सेवन करावे. गुळामध्ये कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम ही जीवनसत्वे असल्यामुळे थकवा दुर होतो. घसा आणि फुफ्फुसातील संक्रमाणापासून वाचण्यासाठीही गुळाचे सेवन करणे फायद्याचे असते. ज्या लोकांना मधुमेहाची समस्या असते ते लोक साखरेऐवजी गुळाचे सेवन करू शकतात. कारण गुळ हा नैसर्गिक साखर आहे. तसेच गुळाच्या सेवनामुळे पचनक्रियासुध्दा चांगली राहते.
मध पोषक तत्व व नैसर्गिक गोडव्याने परिपूर्ण
मध हे अनेक पोषक तत्व व नैसर्गिक गोडव्याने परिपूर्ण असते. मध शरीराला भरपूर लवकर उर्जा प्रदान करण्यास मदत करते. मध आपली रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होण्यापासून बचाव करण्यासोबतच ती मजबूत बनवू शकते. मध घशातील खवखव दूर करते आणि शरीराला आतून उष्ण ठेवते. मधात अॅंटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे इतर गंभीर आजार शरीरापासून कोसो दूर राहतात. मधुमेह असणा-या लोकांनी मधाचे प्रमाणात सेवन करावे. मध घातलेला काढा घेणं थंडीच्या दिवसांत अत्यंत लाभदायक असतं.
आल्यामुळे सर्दी-पडसं, खोकला व ताप यासारखे आजार दूर
आलं हे फक्त चहाचा स्वाद वाढवण्यासाठीच उपयोगी नसून इतर गंभीर आजार दूर करण्यासाठी औषधांच्या स्वरुपात देखील वापरलं जातं. आलं शरीरावर थर्मोजेनिक प्रभाव पाडतं. ज्यामुळे शरीराला आतून गरमी मिळते. आल्यामुळे सर्दी-पडसं, खोकला व ताप यासारखे आजार दूर होतात. खवखवणा-या घशासाठी आलं रामबाण उपाय असतं.
[टीप : वरील लेख केवळ माहितीसाठी आहे.. ]



