Bhimashankar temple closed : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर 9 जानेवारी पासून बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजे भाविकांना आता 9 जानेवारी पासून 3 महिन्यांपर्यंत दर्शन घेता येणार नाही.
मिळालेल्या माहितीनुसार बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर मंदिर हे 9 जानेवारी पासून पुढील 3 महिने बंद ठेवण्यात येणार आहे. कारण भिमाशंकर येथील मुख्य मंदिराच्या सभा मंडपाचे नव्याने काम होणार आहे. यावेळी कोणतीही दुर्घटना घडु नये यामुळे मुख्य मंदिर दर्शानासाठी तीन महिने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
याबाबत श्री.भीमाशंकर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेण्यात आली होती त्यावेळी या विषयावर सविस्तर चर्चा करून सर्वाच्या सहमतीने मंदीर तीन महिन्यासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत जिल्हाधिकारी यांनी देखील या निर्णयाला हिरवा झेंडा दर्शविला.
हे ही वाचा : कबुतरांना दाणे टाकणे पडले महागात; देशातील पहिली शिक्षा
महाशिवरात्रीसाठी या कालावधीत राहणार सुरु
भीमाशंकराच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी असते. तर खास करून महाशिवरात्रीच्या निमित्ताने लाखो भाविक भक्त दर्शनासाठी येतात. त्यामुळे यंदाच्या महाशिवरात्रीच्या निमित्त मंदिर बंद ठेवायचे तरी कसे हा प्रश्न देखील बैठकीत मांडण्यात आला. यावर देखील महत्वपूर्ण निर्णय घेतला. महाशिवरात्रीच्या कालावधीत म्हणजेच 12 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2026 या सात दिवसांच्या कालावधीत मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले राहणार आहे. त्यानंतर पुन्हा मंदिर भाविकांसाठी बंद राहील.
संरचनात्मक आणि स्थापत्य स्वरूपाची कामे करण्यात येणार
विकास आराखड्यानुसार भाविकांची सुरक्षितता, सोयी सुविधा, गर्दी व्यवस्थापन या सर्वांचा विचार करून नवीन आणि सुसज्ज सभामंडप आणि पायरी मार्गाचे बांधकाम करण्यात येणार आहे. या कामासाठी सध्या असलेला जुना सभामंडप काढून टाकण्यात येणार असून संरचनात्मक आणि स्थापत्य स्वरूपाची कामे करण्यात येणार आहे. या कामाचे स्वरूप आणि व्याप्ती लक्षात घेऊन भाविकांची सुरक्षितता याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन
पुण्यातील श्री. क्षेत्र भीमाशंकर येथील मंदिराची कामे नियोजित पद्धतीने व्हावी यासाठी 3 महिने मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तरीही भाविकांनी आणि नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आहे.






