UK Prime Minister News: ब्रिटनच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या संभाव्य राजीनाम्याच्या चर्चांनी जोर धरला असून, त्यांच्या पुढील निर्णयाकडे देशासह जगाचे लक्ष लागले आहे.
ब्रिटनच्या राजकीय वर्तुळात सध्या मोठ्या घडामोडी घडत असल्याची चर्चा सुरू आहे. काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून त्यांच्या संभाव्य राजीनाम्याबाबतही तर्क- वितर्क लावले जात आहेत. तथापि, पंतप्रधानांच्या निकटवर्तीयांनी या दाव्यांचे खंडन करत स्टार्मर यांचे लक्ष पूर्णपणे देशाच्या कारभारावर केंद्रित असल्याचे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा: NEET 2026 Re-Exam: आज 22 लाख विद्यार्थी पुन्हा देणार परीक्षा; Air Forceने सुरक्षित पोहोचवले पेपर
नव्या नेतृत्वाची गरज
राजकीय विश्लेषकांच्या मते, अलीकडील घडामोडींमुळे लेबर पक्षातील अंतर्गत मतभेद अधिक ठळकपणे समोर आले आहेत. काही नेत्यांनी पक्षाच्या भविष्यासंदर्भात नव्या नेतृत्वाची गरज व्यक्त केल्याचेही सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर स्टार्मर यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.
दरम्यान, स्टार्मर सध्या त्यांच्या अधिकृत ग्रामीण निवास्थानी असून आगामी निर्णयांबाबत विचारमंथन करत असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षातील वरिष्ठ नेते आणि सहकाऱ्यांसोबतही परिस्थितीवर चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
काही खासदारांनी उघडपणे नाराजी व्यक्त
लेबर पक्षातील काही खासदारांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्याने नेतृत्वावरचा दबाव वाढला आहे. संसदेतील पक्षाच्या एका गटाने स्टार्मर यांच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केल्याने राजकीय वातावरण अधिक तापले आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वासमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे.
मात्र, अधिकृत स्तरावर कोणतीही घोषणा झालेली नसून परिस्थितीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील काही दिवसांत होणाऱ्या निर्णयांमुळे ब्रिटनच्या राजकारणाला नवे वळण मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.









