Health Tips After 30: बदलत्या जीवनशैलीमुळे तिशीनंतर अनेक आजारांचा सामना करावा लागतो. जर तुम्हाला आरोग्य चांगले ठेवायचे असेल आणि आयुष्य दीर्घकाळ निरोगी जगायचे असेल तर आपली जीवनशैली व्यवस्थित असणे अत्यंत महत्वाचे आहे.
तिशीनंतर आपल्या दैनंदिन सवयी जसे की खाणे-पिणे, झोप, बसणे- उठणे आणि व्यायाम या सर्व गोष्टी संतुलित असायला हव्यात. योग्य पद्धतीने या सवयी पाळल्यास शरीराला दिर्घकाळ फायदा होतो.
तज्ज्ञांच्या मते, तिशीनंतर केवळ डाएट पाळणे किंवा अधूनमधून व्यायाम करणे पुरेसे नसते. निरोगी आणि फिट जीवनासाठी काही चुकीच्या सवयी बदलून आरोग्यदायी सवयी अंगीकारणेही तितकेच गरजेचे आहे.
नियमित व्यायाम करा
तिशीनंतर, दररोज किमान ३० मिनिटे तरी शारीरिक हालचाल करणे आवश्यक आहे. चालणे, धावणे किंवा हलका व्यायाम केल्याने हृदय निरोगी राहते आणि शरीर तंदुरुस्त राहते. यामुळे वजन नियंत्रणात राहते तसेच ताण-तणावही कमी होण्यास मदत होते.
पुरेसे पाणी प्या
पाणी हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मानवी शरीराचा मोठा भाग पाण्याने बनलेला असल्यामुळे नियमितपणे पाणी पिणे गरजेचे असते. पाणी पिल्याने शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात, पचन सुधारते आणि मेंदूचे कार्य व्यवस्थित राहते. तसेच पाणी शरीरातील पोषक घटक सर्व अवयवांपर्यंत पोहोचवण्यास मदत करते.
दिवसातून किमान २ वेळा संतुलित आहार घ्या
आपल्या शरीराला आवश्यक पोषण मिळण्यासाठी दिवसातून तीन वेळा योग्य प्रमाणात जेवण करणे गरजेचे आहे. संतुलित आहारामध्ये साधारणतः ६० ते ७० टक्के कार्बोहायड्रेट आणि १० ते १५ टक्के प्रोटीन असणे आवश्यक आहे. योग्य आहार न घेतल्यास पचनसंस्था नीट काम करत नाही आणि रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होऊ शकतो.
फळे आणि भाज्या आहारात समाविष्ट करा
आरोग्यासाठी विविध रंगांची फळे आणि भाज्या खाणे फायदेशीर असते. याला “रेनबो डाएट” असेही म्हणतात. अशा आहारामुळे शरीराला भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. यामुळे त्वचा, केस आणि एकूण आरोग्य चांगले राहते.
जेवण आणि झोप यामध्ये अंतर ठेवा
जेवण केल्यानंतर लगेच झोपणे आरोग्यासाठी योग्य नाही. रात्री शरीराची चयापचय क्रिया मंदावते. त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर किमान दोन तासांनी झोपायला जाणे अधिक योग्य ठरते. असे केल्याने वजन वाढण्याची शक्यता कमी होते आणि पचन व्यवस्थित होते.












