Digital Detox: आजकालच्या डिजिटल युगात सोशल मीडिया आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. मात्र यामुळे अनेक गंभीर आजार होताना दिसत आहेत.
आजच्या डिजिटल युगात मोबाईल, लॅपटॉप आणि सोशल मीडिया आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. मात्र सतत स्क्रीनसमोर राहण्याच्या सवयीमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. चला तर जाणून घेऊया डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय.
डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय?
डिजिटल डिटॉक्स म्हणजे ठराविक काळासाठी मोबाईल, सोशल मीडिया आणि इतर डिजिटल साधनांचा वापर कमी करणे किंवा पूर्णपणे टाळणे. यामुळे मेंदूला विश्रांती मिळते आणि मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. तज्ज्ञांच्या मते, ही केवळ जीवनशैली नाही तर आरोग्यासाठी आवश्यक सवय आहे.
हेही वाचा: सीएनजी दरवाढीचा फटका; पेट्रोल-डिझेलनंतर आता CNG महागलं
सतत स्कीन वापराचे दुष्परिणाम
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सतत मोबाईल किंवा स्क्रीन पाहण्यामुळे झोपेच्या समस्या तणाव, डोकेदुखी आणि डोळ्यांचे आजार वाढत आहेत. रात्री उशिरापर्यत मोबाईल वापरल्याने मेंदूला पुरेशी विश्रांती मिळत नाही.
सोशल मीडियामुळे सतत तुलना करण्याची भावना वाढते, ज्याचा परिणाम आत्मविश्वास आणि मानसिक शांततेवर होतो. काही लोकांना मोबाईल नसल्यास अस्वस्थता जाणवते, ज्याला डिजिटल अवलंबित्व मानले जाते.
शरीरावर होणारे परिणाम
दीर्घकाळ स्क्रीन वापरामुळे “टेक नेक” ही समस्या वाढत आहे. सतत खाली मान घालून मोबाईल पाहिल्याने मानदुखी, पाठदुखी आणि डोकेदुखी निर्माण होते.
डोळ्यांवर ताण येऊन कोरडेपणा, जळजळ आणि धूसर दिसण्याची समस्या वाढत आहे. लहान वयातही अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात दिसू लागल्या आहेत.
कोणते परिणाम होतात
डिजिटल वापर वाढल्यामुळे घरातील संवाद कमी होत आहे. एकाच घरात असूनही प्रत्येकजण मोबाईलमध्ये गुंतलेला असतो, ज्यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. हळूहळू घरातील वातावरणात शांतता कमी होऊन तणाव वाढत आहे.
डिजिटल डिटॉक्सचे उपाय
तज्ज्ञांच्या मते, काही सोप्या सवयींनी मोठा फरक पडू शकतो:
सकाळी उठल्यानंतर काही वेळ मोबाईल टाळावा
जेवताना स्क्रीनपासून दूर राहावे
झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर बंद करावा
आठवड्यातून किमान एक दिवस डिजिटल ब्रेक घ्यावा
निसर्गात वेळ घालवणे, कुटुंबासोबत संवाद वाढवणे आणि प्रत्यक्ष जीवनातील क्रियाकलापांमध्ये सहभागी होणे यामुळे मानसिक आरोग्य सुधारते आणि तणाव कमी होतो.






