Rohit Pawar Health: सध्या गेल्या दोन दिवसांपासून रोहित पवार पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन करत आहेत. या दरम्यान त्यांच्या प्रकृतीबाबत चिंताजनक माहिती समोर आली आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं काय घडलं आहे.
पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांच्या प्रकृतीबाबत चिंताजनक माहिती समोर आली आहे. आंदोलनामुळे त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून त्यांच्या तब्येतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्य सरकारच्या कर्जमाफी धोरणाविरोधात आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रोहित पवार यांनी विठ्ठलाच्या पंढरपुरात उपोषण सुरू केले आहे. “जोपर्यंत सरसकट कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.
हेही वाचा: PM किसान लाभार्थ्यांनो सावधान! ई-केवायसी न केल्यास अडकू शकतात 2,000 रुपये; 23वा हप्ता कधी येणार?
सरकारशी संवाद आणि चर्चा
रोहित पवार यांनी सांगितले की, यापूर्वी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांशी आणि कृषी मंत्र्यांशी संवाद झाला आहे. सरकारकडून मंगळवारी बैठक बोलावण्यात आली असून या चर्चेत तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, आंदोलन हे शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्याने ठोस निर्णयाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“माझे कुटुंब चिंतेत” – रोहित पवार
आंदोलनाबाबत बोलताना त्यांनी आपल्या कुटूंबाची चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, घरातील सदस्यही त्यांच्या तब्येतीबाबत चिंतेत असून मुलांनाही परिस्थितीचे गांभीर्य समजत आहे. कुटुंबाकडूनही त्यांना आंदोलन थांबवण्याबाबत विनंती होत असल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा
रोहित पवार यांनी पुढील काही दिवस पंढरपूरमध्येच आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे सांगितले असून त्यानंतर नामदेव पायरीजवळ उपोषण हलवण्याचा इशाराही दिला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा त्यांचा पवित्र आहे.
तब्येत खालावली, डॉक्टरांचा सल्ला
डॉक्टरांच्या माहितीनुसार, उपोषणामुळे रोहित पवार यांच्या शरीरातील साखरेची पातळी सुमारे ८३ mg/ dl इतकी आली आहे. त्यांना ORS घेण्याचा सल्ला देण्यात आला असून गरज भासल्यास सलाईन द्यावे लागू शकते. सध्या त्यांना विश्रांती घेण्याचा आणि जास्त बोलणे टाळण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.
सरकारवर वाढू शकतो दबाव
या आंदोलनामुळे राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या आणि आरोग्याच्या मुद्द्यामुळे सरकारवर निर्णय घेण्यासाठी दबाव वाढू शकतो, अशी चर्चा सुरू आहे.










