जगात सर्वांत श्रीमंत, बलाढ्य आणि प्रगत देशांपैकी एक असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतरपासूनच ट्रम्प सतत कोणत्या ना कोणत्या वादात अडकलेले दिसले. कधी देशातील नागरिकांशी, तर कधी मोठ्या उद्योजकांशी; कधी शेजारी देशांशी तर कधी चीन, रशिया, उत्तर कोरिया अशा बलाढ्य राष्ट्रांशी त्यांच्या कुरघोडी सुरूच असतात. आणि जर कोणीच शिल्लक उरला नाही, तर भारत हा त्यांच्या टीकेचा विषय ठरतो. कधी कधी तर प्रश्नच पडतो की अमेरिका भारताचा मित्र का वैरी? चला तर मग सुरु करूया ट्रम्प यांचा वादांचा प्रवास.
डोनाल्ड ट्रम्प: शांततेच्या मुखवट्यात जगावर मक्तेदारीचा खेळ
वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि विद्यमान पुनर्निर्वाचित प्रमुख डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. शांततेचा चेहरा दाखवत, पण प्रत्यक्षात एकेक देशावर दडपशाही करत, ट्रम्प यांनी स्वतःचा अजेंडा पुन्हा एकदा जागतिक व्यासपीठावर लादायला सुरुवात केली आहे. त्यांच्या नेतृत्वात अमेरिका पुन्हा आक्रमक परराष्ट्र धोरण स्वीकारत आहे. व्यापार, संघर्ष, मध्यस्थी आणि प्रवासबंदी यांतून त्यांनी स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे आणि त्या सर्वाच्या मागे आहे एक स्वप्न: नोबेल शांतता पुरस्कार.
भारत-पाकिस्तान संघर्ष: ‘मध्यस्थी’ की केवळ श्रेय घेणं?
मे 2025 मध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर वाढलेल्या तणावानंतर ट्रम्प यांनी दोन्ही देशांना खुलेआम इशारा दिला “जर युद्ध थांबवलं नाही तर व्यापार करार संपवू.” काही दिवसांत शस्त्रसंधी जाहीर झाली, आणि ट्रम्प यांनी लगेच सोशल मीडियावर “मी युद्ध थांबवलं” असा दावा केला. पाकिस्तानने त्यांचे समर्थन करत नोबेल शांतता पुरस्कारासाठी त्यांचं नामांकन जाहीर केलं. मात्र भारताने हे पूर्णतः फेटाळून लावलं आणि सांगितलं की, “शस्त्रसंधी केवळ लष्करी चर्चांमुळे शक्य झाली, अमेरिकेच्या मध्यस्थीचा काही संबंध नाही.”
रशिया-युक्रेन युद्धात सौदेबाजीचा प्रयत्न
ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेनमधील संघर्षात स्वतःहून मध्यस्थी केली, परंतु त्यांच्या दृष्टिकोनात खरे शांततेचे प्रयत्न कमी आणि व्यापारिक अटी अधिक होत्या. नैसर्गिक संसाधनांचा हिस्सा अमेरिकेला देण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला. यामुळे युरोपीय युनियनमध्ये अस्वस्थता पसरली.एकीकडे ट्रम्प युक्रेनच्या पत्रकाराची स्तुती करतात, तर दुसरीकडे त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांचा व्हाइट हाऊसमध्ये कपड्यांवरून उपहास करतात.
इराण-इस्राईल संघर्ष: आगीत तेल?
जागतिक राजकारणातील एक नाट्यमय वळण मिळालं जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेला एक आठवड्याचा इशारा, आणि त्याच रात्री इराणच्या अणुकेंद्रावर झालेला भीषण हल्ला. हा योगायोग म्हणायचा की नियोजित कारवाई? जगभरात यावर चर्चा सुरु आहे. एका पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी इराणला थेट इशारा दिला होता “आता तुमच्याकडे एक आठवडा आहे, शांततेचा मार्ग निवडा अन्यथा परिणाम भोगावे लागतील.” हे वक्तव्य होतं न होतं तोपर्यंत, रात्रीच्या अंधारात इराणच्या एका महत्त्वाच्या अणुकेंद्रावर जोरदार स्फोट झाला. या संपूर्ण प्रकरणात लक्षात राहिलं ते ट्रम्प यांचं वेळेवर दिलेलं विधान, त्याचं संभाव्य परिणाम आणि त्यानंतरही परिस्थितीवर मिळवलेला ताबा.
ट्रॅव्हल बॅन: 12 देशांना अमेरिकेचा व्हिसा बंद
2025 मध्ये अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत 12 देशांवर पूर्ण प्रवासबंदी लागू केली. यामध्ये अफगाणिस्तान, इराण, इराक, सोमालिया, सीरिया, लीबिया, येमेन, सूडान, हायती, उत्तर कोरिया, नायजेरिया आणि क्युबा या देशांचा समावेश आहे. या बंदीमुळे या देशांतील नागरिकांना अमेरिकेचा व्हिसा, पासपोर्ट सेवा किंवा स्थलांतराची कोणतीही सुविधा नाकारण्यात आली आहे. मानवाधिकार संस्थांनी आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या असून, त्याला धार्मिक आणि वंशभेदात्मक प्रवृत्तीचा ठपका ठेवण्यात आला आहे. या निर्बंधांमुळे अनेक कुटुंबं तुटली असून, विद्यार्थी, कामगार आणि निर्वासितांसाठीही अमेरिका गाठणं जवळपास अशक्य बनलं आहे.
व्यापार युद्ध आणि आर्थिक दडपशाही
2025 मध्ये ट्रम्प प्रशासनाने चीन, युरोप आणि भारतासह प्रमुख देशांवर मोठ्या प्रमाणात आयातशुल्क (टॅरिफ) लादले. अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर 20% ते 54% दरम्यान टॅरिफ आकारले गेले. या निर्णयामुळे जागतिक व्यापारात मंदीची लाट आली आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली. अनेक देशांनी याला “आर्थिक संरक्षणवादाचा धोका” म्हणून टीका केली आहे.
ट्रम्प प्रशासनाने विशेषतः चीनला उद्देशून आयातीवर अतिरिक्त टॅरिफ लागू केले. स्मार्टफोन, चिप्स, इलेक्ट्रिक वाहनांचे भाग, सौरउर्जा उपकरणे आणि 5G तंत्रज्ञानाशी संबंधित वस्तूंवर जास्त शुल्क लावण्यात आले. ज्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापारयुद्ध पुन्हा उफाळून आलं. या कडक धोरणांमुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली, बाजारात अनिश्चितता वाढली, आणि आंतरराष्ट्रीय व्यापार मंदावला. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (WTO) व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने याविषयी चिंता व्यक्त केली आहे, तर मानवाधिकार आणि व्यापारी संघटनांनी याला “आर्थिक राष्ट्रवादाचा धोका” असे संबोधले आहे.
एलॉन मस्क आणि ट्रम्प यांच्यात AI, सोशल मीडिया (X/Twitter), आणि जागतिक डेटा नियंत्रणावरून मतभेद झाले आहेत. ट्रम्प कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला सहन करत नाहीत, मग तो कॉर्पोरेट जगतातील असो किंवा राजकारणातील.
डोनाल्ड ट्रम्प हे शांततेच्या नावाखाली जगभरात भांडण लावणारे, अटी घालणारे आणि व्यापार वापरून दबाव टाकणारे राष्ट्रप्रमुख आहेत असच दिसून येत. त्यांच्या प्रत्येक हस्तक्षेपामागे खऱ्या शांततेपेक्षा स्वतःचं नाव उजळवणं आणि नोबेल पुरस्कार मिळवण्याचा हव्यास अधिक स्पष्ट दिसतो.
टिपण: हा लेख जागतिक घडामोडींवर आधारित असून, काही भाग विश्लेषणात्मक स्वरूपाचे आहेत. वाचकांनी राजकीय समजूतदारपणा राखावा, हे वयक्तिक मत आहे कुणाला त्रास देण्याचा हेतू नव्हे.
प्रश्न जे विचारायला हवेत:
1. ट्रम्पने भारत-पाकिस्तान संघर्षात खरंच शांतता प्रस्थापित केली की फक्त श्रेय घेतलं?
2. युक्रेन-रशिया करारामागे खरोखर शांतता होती की व्यापारिक सौदा?
3. इस्राईल-इराण युद्धात ट्रम्पने कोणाची बाजू घेतली?
4. व्यापारावर टॅरिफ लावणं हे शांततेसाठी होतं की अमेरिकेच्या मक्तेदारीसाठी?
5. एलॉन मस्कसारख्या दिग्गजांशी सतत वाद का?
6. ट्रॅव्हल बॅन हे सुरक्षा कारणांमुळे होतं की धार्मिक-राजकीय अजेंडा?