झी मराठी या वाहिनीवर लवकरच कमळी या मालिकेचे पदार्पण होणार आहे. सध्या समाज माध्यमांवर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत असून या मालिकेच्या प्रोमोने विश्वविक्रम केला आहे. या प्रोमो मध्ये एक ऐतिहासिक क्षण दर्शविण्यात आला. हा क्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज याना अर्पण केलेली शिवस्तुती होती.
मुंबई, ठाण्यातील सरस्वती मंदिर ट्रस्टच्या पटांगणात एकत्र आलेल्या तब्बल 3000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी एकत्रितरित्या शिवस्तुती गायन केले असून‘ वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया’मध्ये आपले स्थान निर्माण केले. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रभक्तिपर वातावरणात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून द्वीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर 3000 विद्यार्थ्यांनी एकसुरात शिवस्तुती गायली. या वातावरणातील हा ऐतिहासिक, प्रेरणादायी आणि गौरवशाली क्षण होता.
या कार्यक्रमावेळी कमळी मालिकेतील प्रमुख भूमिकेत असलेली नायिका विजया बाबर, केतकी कुलकर्णी, निखिल दामले हे कलाकार उपस्थित होते. यावेळी हे फक्त मालिकेचे प्रोमोशन नसून संस्कारांची आणि अभिमानाच्या जडणघडणीची सुरुवात असल्याचं मत अभिनेत्री विजया बाबर यांनी मांडले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा छोटा प्रयत्न आहे, असेही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमानंतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. शाळा, पालक आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
कमळी ही झी मराठी वर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारी प्रेरणादायक कथा आहे. या मालिकेत एका ध्येयवेड्या, गरीब मुलीची कथा मांडण्यात आली आहे. तिच्या आयुष्यातील अडथळे, तिची सामाजिक परिस्थिती, शिक्षणासाठीची तिची झुंज या मालिकेत अधोरेखित केली आहे. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी देण्याचा आमचा प्रयत्न असतो. ‘कमळी’ मालिकेद्वारे आम्ही शिक्षण, संस्कार आणि इतिहास यांचे त्रिसूत्री एकत्र गुंफली आहे. प्रेक्षकांना एका वेगळ्या प्रवासाची अनुभूती या मालिकेतून मिळेल, असे झी मराठीचे क्रिएटिव्ह हेड स्वप्नील जोशी यांनी सांगितले.