शीर्षकावरून तर एक अंदाज लागलाच असेल की, हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात आयोजित करण्यात आलेला वरळी डोममधील ‘मराठी विजयी मेळावा’ सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. मराठी जनतेने प्रचंड संख्येने उपस्थित राहून केवळ बंधुत्व आणि अस्मिता यांचा उत्कट अनुभव घेतला. हे दृश्य अनेकांसाठी याची डोळा, याची देहाने समाधान देणारं ठरलं. तब्बल 20 वर्षांनंतर राजकीय व्यासपीठावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत आणि सत्तेत एक नवी ताकद उदयाला येत असल्याचा संकेत त्यांनी दिला. या जोडीच्या उपस्थितीने विरोधकांमध्ये खळबळ निर्माण झाली, आणि भाषणांतून मराठी भाषेबाबतची तळमळ त्यांनी उघडपणे व्यक्त केली. मात्र, खरा प्रश्न हा आहे की, हा मेळावा खरंच केवळ मराठी अस्मितेसाठी आयोजित केला होता की आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक राजकीय डाव म्हणून आखला गेला? भाषणांतून जरी मराठीबद्दलची आस्था दिसली, तरीही राजकीय संकेतही स्पष्टपणे जाणवले, आणि त्यामुळे ‘मराठी विजयी मेळावा’ हा भाषेच्या प्रेमाचा अविष्कार होता की सत्तेसाठीचा रणनीतीचा भाग, हे ठरवणे आता जनतेच्या निरीक्षणावर आणि पुढील घडामोडींवर अवलंबून आहे.
मराठी जनतेच्या मनात आलेल्या अनेकदाच्या प्रश्नाला आता पूर्णविराम मिळून आपण एकत्र आलो आहोत; तेही एकत्र राहण्यासाठी हा रणमंत्र उद्धव ठाकरेंनी विरोधकांना ठणकावून सांगितला. आणि मराठी जनतेला एक आश्वासक संदेश दिला. हा मेळावा फक्त भाषेच्या अस्मितेसाठीच होता; मात्र या एकत्रीकरणामागे केवळ मराठी भाषेची तळमळ आहे की, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचा डाव, यावर चर्चा सुरू झाली आहे. परंतू कुठल्याही भांडणांपेक्षा आणि वादापेक्षा आपला महाराष्ट्र मोठा आहे; ह्यावरून राज साहेबांच्या मनात असलेली मराठी बाबतीत गोडी आणि तिची तळमळ समजून येते. कुठलीही गोष्ट ह्या महाराष्ट्रात खपवून घेतली जाणार नाही आणि जर कुणात हिंमत असेल तर नक्कीच काहीतरी करून दाखवा ह्या उदगाराने राज ठाकरेंनी विजयी मेळाव्यात रणशिंग फुंकले आहे. आपल्या भाषणांत राज ठाकरे यांनी मराठी भाषेसाठी आक्रमक आणि स्पष्ट भूमिका मांडली.
उद्धव ठाकरेंनी सुद्धा आपले विधान स्पष्टपणे मांडले; परंतु त्यांच्या भाषणात मराठीची अस्मिता आणि भाषेच्या सन्मानाचा सूर अपेक्षेपेक्षा जरा कमीच जाणवला. “एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी” या त्यांच्या वाक्याने राजकीय संकेत अधिक ठळकपणे जाणवले आणि त्यामुळेच भाषेच्या मुद्द्याऐवजी त्यांच्या भाषणात वैयक्तिक आणि पक्षीय राजकारणाचा बाज अधिक उठून दिसला. ‘म’ म्हणजे खरंच ‘मराठी’ की मुंबई ‘महानगरपालिका’, असा संभ्रम त्यांच्या भाषणातून जाणवला. मराठी अस्मिता, भाषेचं जतन आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी हा मेळावा होता, हे अधोरेखित करण्याची संधी असूनही, उद्धव ठाकरेंच्या भाषणात त्या विषयावर अपेक्षित ठामपणा आणि भावनिक ओलावा जाणवला नाही. मेळाव्यात कुठल्याही पक्षाचा झेंडा नसला, तरीही वक्तव्यांचा आणि मंचावरील उपस्थितीचा स्वर राजकीयच होता. जनसमुदायाची उस्फूर्त प्रतिक्रिया पाहता हे स्पष्ट होते की, हा मेळावा केवळ भाषेपुरता मर्यादित न राहता आगामी राजकीय समीकरणांसाठी एक पायाभूत व्यासपीठ ठरू शकतो.
आता सर्वात महत्वाचा आणि गांभीर्याचा प्रश्न उपस्थित होतो की, जरी या एकत्र येण्यामागे मराठी भाषा आणि तिच्या अस्मितेचा विषय दिसत असला, तरी या मागे काही तरी राजकीय स्वार्थ किंवा रणनीती चालू असू शकते का? आगामी काही महिन्यांत होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचा प्रचंड प्रभाव आणि दबाव लक्षात घेता, हे एकत्रिकरण खरंच महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी हितकारक ठरेल का, याबाबत शंका निर्माण होते. कारण, सध्याच्या राजकीय वातावरणात कोण, कधी, कोणता पक्ष बदलत आहे किंवा कोणत्या पक्षाकडे झुकत आहे याचा नेम काढणे कठीण आहे. त्यामुळे ‘म’ म्हणजे खरी ‘मराठी’ अस्मिता आहे की ‘महापालिका’ सत्तेचा खेळ, हे उघड होण्यास आता फार वेळ उरलेला नाही. या चळवळीचा परिणाम मराठी माणसासाठी एक प्रगतीचा नवा मार्ग असेल की सत्तेसाठीचा एक शिडीचा उपक्रम, हे पाहणे हे भविष्यकाळातील सर्वांनाच औत्सुक्याने वाट पाहावे लागेल. महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी आणि मराठी संस्कृतीच्या जपणुकीसाठी हा निर्धार कितपत ठोस ठरतो, हेच आता खरे परीक्षण ठरेल.