मेरठ (उत्तर प्रदेश) – मेरठमध्ये वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेनंतर 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेचं वजन सुमारे 136 किलो होतं आणि तिला अनेक वर्षांपासून स्थूलतेचा त्रास होता. वजन कमी करण्यासाठी तिने खासगी रुग्णालयात बॅरिएट्रिक सर्जरी केली होती.
ऑपरेशन यशस्वी झाल्याचं सांगितलं गेलं, मात्र काही तासांतच तिची प्रकृती बिघडली आणि तिला वाचवता आलं नाही.
कुटुंबीयांचा गंभीर आरोप
मृत महिलेच्या मुलीचा आरोप आहे की, डॉक्टरांनी टाके लावताना अक्षम्य हलगर्जीपणा केला. ऑपरेशनदरम्यान योग्य खबरदारी न घेतल्यामुळेच तिच्या आईचा मृत्यू झाल्याचा दावा तिने केला.
डॉक्टरांचे स्पष्टीकरण
दुसरीकडे रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांनी हे आरोप फेटाळले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, सर्व वैद्यकीय प्रक्रिया नियमाप्रमाणे पार पाडण्यात आल्या होत्या आणि महिलेचा मृत्यू अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला आहे.
पोलीस चौकशी सुरू
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी प्रकरणाची दखल घेतली असून शवविच्छेदनाचा अहवाल येईपर्यंत कोणतीही भूमिका घेण्यात येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल.