November 2025 updates in India : नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून, सर्वसामान्यांसाठी अनेक मोठे बदल लागू करण्यात आले आहेत. काही बदल दिलासा देतील, तर काही तुमच्या खिशावर थेट परिणाम करतील. सरकार आणि वित्तीय संस्थांनी 1 नोव्हेंबरपासून एलपीजी सिलिंडर, बँकिंग, पेन्शन, जीएसटी नोंदणी आणि आधार अपडेटशी संबंधित नवीन नियम लागू केले आहेत. तुमच्या दैनंदिन खर्चावर आणि कामावर परिणाम करु शकणारे हे महत्त्वाचे बदल कोणते जाणून घेऊया.
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कपात :
नोव्हेंबरच्या सुरुवातीला, सरकारनं व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत काही सवलत दिली. 19 किलोच्या सिलिंडरची किंमत 4.5 ते 6.5 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, दिल्लीमध्ये 19 किलोच्या सिलिंडरची नवीन किंमत 1,590.50 आहे, जी पूर्वी 1595.50 होती. मात्र घरगुती 14.2 किलोच्या सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही, म्हणजेच सध्या घरगुती स्वयंपाकघरांना कोणताही दिलासा मिळालेला नाही.
जीएसटी नोंदणी प्रक्रिया झाली सोपी :
1 नोव्हेंबरपासून एक नवीन स्वयंचलित नोंदणी प्रणाली लागू झाली, ज्यामुळं पात्र अर्जदारांना तीन कामकाजाच्या दिवसांत जीएसटी नोंदणी मिळू शकेल. हे अर्जदारांच्या दोन श्रेणींना लागू होईल. सिस्टम डेटा विश्लेषणाद्वारे निवडलेले आणि ₹2.5 लाखांपेक्षा कमी मासिक कर देयता असलेले.
बँक ग्राहकांना दिलासा (November 2025 updates in India)
आता तुम्ही तुमच्या खात्यात किंवा लॉकरमध्ये फक्त एक ऐवजी चार नामांकित व्यक्ती जोडू शकता. प्रत्येक नामांकित व्यक्तीला किती हिस्सा मिळेल हे ग्राहक ठरवू शकतात. यामुळं भविष्यातील वादांची शक्यता कमी होईल. सरकारनं पेन्शनधारकांना आठवण करुन दिली आहे की 1 ते 30 नोव्हेंबर दरम्यान जीवन प्रमाणपत्रे सादर करणं अनिवार्य आहे. एनपीएस वरुन यूपीएसमध्ये स्विच करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
आता, जर तुम्ही एसबीआय क्रेडिट कार्ड वापरून तुमच्या डिजिटल वॉलेटमध्ये ₹1,000 पेक्षा जास्त रक्कम भरली तर तुम्हाला अतिरिक्त 1% शुल्क आकारावं लागेल. शिवाय, यूआयडीएआयनं आधार अपडेट शुल्कात सुधारणा केली आहे. मुलांसाठी बायोमेट्रिक अपडेट मोफत आहे, परंतु प्रौढांसाठी, डेमोग्राफिक अपडेटसाठी 75 रुपये आणि बायोमेट्रिक अपडेटसाठी 125 रुपये खर्च येईल.






