पुणे : देशभरात पैसे पाठवण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी बँकेत जायची हल्ली गरज पडत नाही. घरी बसल्या तुम्ही पैशांची देवाणघेवाण करू शकता. त्यासाठी सरकारने ऑनलाइन पेमेंटची सुविधा देशभरात उपलब्ध करून दिली. मात्र, UPI व्यवहारांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवे नियम जाहीर केले असून ते टप्प्याटप्प्याने लागू होणार असल्याची माहिती शासनाने दिली आहे. UPI व्यवहारांसाठी 15 सप्टेंबर 2025 पासून नवे नियम लागू होणार आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे दिवसात वारंवार बँक बॅलन्स तपासण्यावर मर्यादा आणण्यात आली आहे. त्यामुळे, PhonePe, GPay किंवा इतर कोणत्याही UPI ॲपमधून बॅलन्स चेक करण्याची सुविधा दिवसाला जास्तीत जास्त 50 वेळाच मिळणार असून त्यापेक्षा जास्त वेळा प्रयत्न केल्यास 24 तासांसाठी बॅलन्स तपासण्याची सुविधा बंद होईल. तसेच प्रत्येक व्यवहारानंतर लगेच अपडेटेड बॅलन्स स्क्रीनवर दिसणार असल्याने ग्राहकांना वेगळा बॅलन्स चेक करण्याची गरज राहणार नाही.
तसेच, UPI वापरताना एका ॲपमध्ये दिवसाला जास्तीत जास्त 25 बँक खाती लिंक करता येणार आहेत. एखादा व्यवहार पेंडिंग असेल तर त्याची स्टेटस फक्त 3 वेळाच तपासता येईल आणि दोन स्टेटस चेकमध्ये किमान 90 सेकंदांचा गॅप ठेवावा लागेल. त्याचप्रमाणे, ऑटो डेबिट जसे की EMI, सबस्क्रिप्शन, वीजबिल्स यांसारखे व्यवहार आता नॉन-पिक अवरमध्ये म्हणजे सकाळी 10 वाजण्यापूर्वी किंवा रात्री 9.30 नंतरच होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ऑनलाइन पैसे पाठवताना मोठ्या रकमेवरील व्यवहारासाठीदेखील नवीन मर्यादा लागू करण्यात आल्या असून त्यामध्ये इन्शुरन्स, प्रवास, EMI किंवा कर्जफेड यांसाठी एकाच व्यवहारात पाच लाख रुपयेपर्यंत पेमेंट करण्याची परवानगी आहे, तर दिवसाला एकूण दहा लाख रुपयांपर्यंत व्यवहार शक्य होणार आहेत. मात्र साध्या P2P म्हणजे मित्र किंवा नातेवाईकांना पैसे पाठवण्याच्या व्यवहारासाठी मर्यादा पूर्वीप्रमाणेच एक लाख रुपये राहणार आहे.
याशिवाय 1 ऑक्टोबरपासून P2P Collect Request ही सुविधा पूर्णपणे बंद होणार आहे. यामुळे फसवणुकीचे प्रकार कमी होण्यास मदत होईल. हे सर्व बदल UPI सर्व्हरवरील ताण कमी करण्यासाठी, फसवणुकीला आळा घालण्यासाठी आणि वापरकर्त्यांना अधिक सुरक्षित तसेच सुरळीत अनुभव मिळावा यासाठी करण्यात आले आहेत. ग्राहकांनी वारंवार बॅलन्स चेक करण्याची सवय बदलून नवीन नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा ॲप तात्पुरते ब्लॉक होऊ शकते.नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने जाहीर केलेल्या या नियमांनुसार PhonePe, Google Pay, Paytm सारख्या लोकप्रिय ॲप्सच्या वापरकर्त्यांना मोठ्या रकमेचे व्यवहार अधिक सुलभपणे करता येणार आहेत.
NPCI या नियमांमागे महत्वाचा हेतू हा मोठ्या पेमेंटसाठी UPI वापरणाऱ्यांना ग्राहकांना अधिक सुविधा देण्यात यावी, रोख व्यवहार कमी करून डिजिटल व्यवहारांना मदत करता यावी. कारण, यामुळे व्यवहारात पारदर्शकता टिकून राहील. NPCI च्या या निर्णयामुळे ऑनलाइन इकोसिस्टम आणखी मजबूत होणार असून PhonePe, GPay, Paytm सारख्या ॲप्सच्या लाखो वापरकर्त्यांना याचा थेट फायदा होणार आहे.