नवी दिल्ली
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि बिहार पोलिसांच्या संयुक्त पथकानं दिल्लीतील रोहिणी परिसरात झालेल्या चकमकीत गुरुवारी पहाटे बिहारमधील चार मोस्ट वॉन्टेड गुंड ठार झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारले गेलेले चारही गुंड बिहारच्या कुख्यात सिग्मा गँगशी संबंधित होते. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मोठ्या प्रमाणात दहशत पसरवण्याचा त्यांचा कट होता.
संयुक्त कारवाई
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि बिहार पोलिसांच्या विशेष पथकानं गुप्त माहितीच्या आधारे संयुक्त कारवाई केली. रोहिणीमध्ये लपलेल्या सराईत गुन्हेगारांची पथकाला अचूक माहिती मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी कारवाई केली.
चारही गुंडांचा मृत्यू
पोलिसांनी गुंड लपून बसलेल्या भागाला वेढा घालून त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले. त्यांनी पोलीस पथकावर गोळीबार केला. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तर देताच. गोळीबारात चार गुंड गंभीर जखमी झाले. त्यांना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे चारही गुडांचा मृत्यू झाला. टोळीचा प्रमुख रंजन पाठक (25) याचादेखील मृत्यू झाला. ही टोळी खून, खंडणी आणि दरोडा यासारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांसाठी वॉन्टेड होती. बिमलेश महातो (25), मनीष पाठक (33) आणि अमन ठाकूर (21) अशी मृत झालेल्या संशयितांची ओळख पटली आहे.
पुढील तपास सुरु
संयुक्त कारवाईनंतर दिल्ली पोलीस आणि बिहार पोलिसांनी महत्त्वपूर्ण यश मिळवल्याचा दावा केला. घटनास्थळावरून पोलिसांनी जिगाना पिस्तूलसह अनेक बेकायदेशीर शस्त्रे आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त केला. पोलिसांच्या माहितीनुसार चकमक सुमारे 15 मिनिटं सुरू होती. गुन्हेगारांनी केलेल्या गोळीबारात अनेक पोलीस जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी समन्वयानं एक महत्त्वपूर्ण कामगिरी केली. या गुंडांच्या इतर साथीदारांची आणि त्यांच्या गुन्हेगारी नेटवर्कची ओळख पटविण्यासाठी पोलीस आता पुढील तपास करत आहेत.