Massive Brawl in Jalgaon : राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील दोन प्रमुख घटक पक्ष असलेली शिंदेंची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जळगाव शहरात शुक्रवारी रात्री मोठा राडा झाला. फक्त राडाच नाही, तर तुफान हाणामारीही झालीय. हा राडा रस्त्यावर न होता थेट शनिपेठ पोलीस ठाण्याच्या आवारातच झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टच्या वादातून सुरू झालेल्या या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाले, ज्यामध्ये भाजपचे माजी नगरसेवक कैलास सोनवणे जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
एका कामाच्या ठेक्यावरून गेल्या काही दिवसांपासून धुसफूस
मिळालेल्या माहितीनुसार या संघर्षाचे मूळ जळगाव महानगरपालिकेच्या काही विकासकामांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे. भाजपचे नगरसेवक कल्पेश सोनवणे, माजी नगरसेवक कैलास सोनवणे आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते राहुल ठाकरे यांच्यात एका कामाच्या ठेक्यावरून गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू होती. शुक्रवारी या वादाने टोक गाठले. दोन्ही गट एकमेकांविरुद्ध तक्रार देण्यासाठी रात्री उशिरा शनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.
काही समजण्याच्या आतच दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडले
पोलीस ठाण्याच्या आवारात दोन्ही बाजूचे शेकडो कार्यकर्ते जमा झाले होते. सुरुवातीला शाब्दिक चकमक सुरू असतानाच, अचानक दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची वाढली आणि त्याचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी काही समजण्याच्या आतच दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडले. यावेळी खुर्च्यांची फेकाफेक आणि आरडाओरडा झाल्याने पोलीस ठाण्यात युद्धभूमीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती.
भाजपचे माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांना मारहाण
या हाणामारीत भाजपचे माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांना मारहाण झाली असून ते जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. पोलीस ठाण्याच्या आतच सुरू असलेला हा राडा पाहून पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी केली. मात्र, जमाव अधिकच आक्रमक होत असल्याने आणि परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी सौम्य लाठीमार करून कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्याच्या आवारातून पांगवले. या घटनेमुळे पोलीस प्रशासनाच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीसाठी हा चिंतेचा विषय
जळगाव जिल्हा हा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष राज्यात सत्तेत एकत्र असतानाही, स्थानिक पातळीवर मात्र त्यांच्यातील संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे. या घटनेनंतर दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली, तरी कार्यकर्त्यांमधील हा तणाव आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीसाठी चिंतेचा विषय ठरू शकतो.
संवेदनशील भागांत अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात
या घटनेनंतर जळगाव शहरात, विशेषतः शनिपेठ भागात तणावपूर्ण शांतता आहे. पोलीस ठाण्याबाहेर आणि संवेदनशील भागांत अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. “कोणीही कायदा हातात घेऊ नये, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध फिर्याद दिली असून, पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास करत आहेत. सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी थेट पोलीस ठाण्यातच कायदा सुव्यवस्थेचा धज्जा उडवल्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात या घटनेची तीव्र चर्चा सुरू आहे.










