मुंबईतील पवई येथील आरए स्टुडिओमध्ये १७ मुलं आणि दोन वृद्धांना ओलीस ठेवून जाळण्याची धमकी देणाऱ्या रोहित आर्यचा पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत मृत्यू झाला. ३० ऑक्टोबर रोजी हा धक्कादायक प्रसंग घडला. मात्र, आता या प्रकरणामागचे अनेक खुलासे आता समोर येत आहेत. अशातच मराठी अभिनेत्री रुचिता जाधव हिने मोठी माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. रोहित आर्यने काही दिवसांपूर्वी आरए स्टुडिओत येण्यासाठी फोन केला होता, असं तिने सांगितल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याला नेमकं काय करायचं होतं असे तर्क लागले जात आहेत.
“मी २०१०-११ मध्ये एक सिनेमा केला होत ‘अरे बाबा पुरे’ त्यावेळी त्याच्या स्टुडीओमध्ये डबिंगला गेली होते. तेव्हा त्याने मला स्वतःची ओळख सांगितली आणि त्यानंतर एकमेकांच्या नंबरची देवाणघेवाण झाली. पण नंतर आमचा काहीच संपर्क नाही झाला. मला माहित होतं, त्याचा काहीतरी प्रोजेक्ट सुरू होता. ४ ऑक्टोबर रोजी दुपारी २:५२ मिनिटाला मला त्यांचा मेसेज आला होता. तो म्हणाला, ‘सिनेमासंदर्भात बोलायचंय आहे जेव्हा फ्री असशील तेव्हा फोन कर. मी संध्याकाळी ६ वाजता त्याला विचारलं आता बोलू शकतो का? त्यानंतर त्याने मला ७:१५ ला मेसेज केला. मग मी त्याला फोन केला. तेव्हा त्याने मला हीच स्टोरी सांगितली,” अशी माहिती रुचिता अभिनेत्री रुचिता जाधव हिने माध्यमांशी बोलताना दिली.
हे ही वाचा – Rohit Arya Encounter : मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आरोपी रोहित आर्याचा एन्काउंटर’मध्ये मृत्यू
‘त्याने मला २३ ऑक्टोबरला मेसेज केला, २७-२८-२९ भेटायला जमेल का? त्यावर मी त्याला २८ तारीख सांगितली. तेव्हा त्याने मला विचारलं, मंगळवारी RA स्टुडीओला भेटू शकतेस का? त्याने मला लोकेशन देखील पाठवलेलं होतं. माझे सासरे हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे मी त्याला मेसेज करून सांगितलं की मी येऊ शकत नाही. आपण, १५ नोव्हेंबरनंतर भेटूयात.’ असं रुचिताने सांगितलं.
मुलांना ओलीस ठेवण्याचा सीन सांगितला..
रुचिता जाधवने सोशल मीडियावर रोहित आर्यासोबत झालेल्या संवादाचे स्क्रीनशोर्टसुद्धा शेअर केले आहेत. त्याचबरोबर अभिनेत्रीनं पोस्ट शेअर करत लिहिलंय की, ‘मला सगळ्यांसोबत काहीतरी वैयक्तिक शेअर करायचं असून मी खूप हादरले आहे. ४ ऑक्टोबर रोजी मला रोहित आर्या या व्यक्तीने फिल्म प्रोजेक्टसाठी संपर्क साधल होता. सिनेमा कशासंबंधी आहे? तर काही मुलांना ओलीस ठेवण्याचा सीन असल्याचं त्याने सांगितलं.
तिथं जात असाल तिथल्या लोकेशनची कुटंबियांना माहिती द्या..
सीन ऐकून मीही आणखी ऐकण्यासाठी तयार झाले. २३ ऑक्टोबर रोजी त्याने मला कधी भेटायचं विचारलं. २७ ऑक्टोबर रोजी त्याने मला पवईच्या आरए स्टुडिओचं लोकेशन पाठवलं. माझ्या घरी इमर्जन्सी असल्याने मी जाऊ शकले नाही. आज मी जेव्हा बातमी पाहिली तेव्हा मला धक्का बसला. मी या घटनेच्या किती जवळ असणार होते हा विचार करून मला स्वस्थ बसवत नाहीये. यातून एकच कळतं की, कामासाठी आपण कोणाला भेटतो हे आधी नीट बघितलं पाहिजे. सुरक्षित राहा, तुमच्या सद्सदविवेकबुद्धीवर विश्वास ठेवा आणि जिथे जात असाल तिथल्या तुमच्या लोकेशनची माहिती आधीच कुटंबातील सदस्याला किंवा मित्रपरिवाराला देऊन ठेवा,’असं रुचिता म्हणाली.











