Wedding invitation cyber attack : राजस्थानातील भीलवाडा शहरातून सायबर गुन्हेगारांचा एक नवा आणि अत्यंत धोकादायक प्रकार समोर आला आहे. ‘महिला मंडळ’ नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपला लक्ष्य करत सायबर चोरांनी लग्नपत्रिकेच्या नावानं एक बनावट लिंक पाठवली. या लिंकवर क्लिक करताच अनेक महिलांचे व्हॉट्सअॅप हॅक झाले आणि मोबाईलचा पूर्ण ताबा सायबर गुन्हेगारांच्या हाती गेला. या ग्रुपमध्ये 150 हून अधिक महिला सदस्य असून, अनेकांच्या मोबाईल्समध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
लग्नपत्रिकेची लिंक आणि फोन हँग होण्याचा प्रकार : 16 ऑक्टोबर रोजी एका सदस्याला तिच्याच मैत्रिणीच्या नावाने लग्नाचे आमंत्रण म्हणून एक लिंक आली. ती ओळखीच्या व्यक्तीकडून आली असे समजून तिने ती उघडताच व्हॉट्सअॅप अॅप अचानक अनइंस्टॉल झाले. त्याच रात्री, एका अनोळखी कॉलनंतर तिचा फोन पूर्णपणे हँग झाला. दुसऱ्या दिवशी तपास केला असता, तिच्या ‘फोन पे’ अॅपद्वारे खात्यातून पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न झाल्याचं आढळलं. सुदैवाने, बँकेच्या सुरक्षा यंत्रणेमुळे मोठी हानी टळली.
काही सेकंदांचा विलंब आणि मोठी फसवणूक टळली : ग्रुपमधील सदस्य रीना जैन यांनी सांगितलं की, “स्वयंपाक करत असताना ग्रुपमध्ये लग्नपत्रिका दिसली. ती ओळखीच्या व्यक्तीची असल्याचं वाटलं. पण काही मिनिटांतच ‘ही लिंक फेक आहे’ असा इशारा आला. जर तो काही क्षण उशिरा आला असता, तर ग्रुपमधील अनेक महिलांची आर्थिक फसवणूक झाली असती.” दुसऱ्या सदस्य ललिता खमेसरा यांनीही सांगितलं की, लिंक उघडताच त्यांचा व्हॉट्सअॅप हटला आणि फोन प्रतिसाद देणं बंद झालं.
‘APK’ फाईलचा नवा धोका : तपासणीत समोर आलं की, ही फसवणुकीची लिंक साधी इमेज नसून ‘APK फाईल’ स्वरूपात होती. ही फाईल इन्स्टॉल होताच ती थेट मोबाईल सिस्टीममध्ये प्रवेश करून हॅकर्सना पूर्ण नियंत्रण देते. भीलवाड्यातील अशोक जैन यांना देखील अशी लिंक आली होती, परंतु त्यांनी वेळेत डाउनलोड प्रक्रिया थांबवली. त्यांनी सांगितले, “हा सायबर फसवणुकीचा नवा प्रकार आहे जो लोकांच्या भावना वापरून त्यांना जाळ्यात ओढतो.”
सायबर सेलने याबाबत तपास सुरू केला असून, नागरिकांना कोणतीही अनोळखी लिंक किंवा आमंत्रण संदेश उघडू नये, असा इशारा देण्यात आला आहे. (Wedding invitation cyber attack)










