पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा शहरात एका २० वर्षीय तरुणाची किरकोळ कारणावरून चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे. ही घटना शहरातील बाहेरपुरा भागात मध्यरात्री १२:३० वाजता घडली. पोलिसांनी मारेकऱ्याला अटक केली आहे.
१८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शिवजयंतीची मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक संपल्यानंतर हेमंत संजय सोनवणे (वय २०, रा. महात्मा फुले नगर, पाचोरा) याच्यावर रोहित गजानन लोणारी (वय २०, रा. शिव कॉलनी, पाचोरा) याने किरकोळ कारणावरून धारदार चाकूने वार केले.
गंभीर जखमी झालेल्या हेमंतला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अशोक पवार व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रोहित लोणारीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हत्या नेमकी कशामुळे झाली? याबाबत अद्याप अधिक माहिती समोर आलेली नाही. पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार करीत आहेत.












