EPF Interest Rate 2025-26: केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२५- २६ साठी पीएफवरील ८.२५ टक्के व्याजदराला मंजुरी दिली आहे. त्यामुळे देशातील सुमारे ७ कोटी EPFO सदस्यांच्या खात्यांमध्ये लवकरच व्याजाची रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता हे पैसे खात्यात नेमके कधी जमा होणार, जाणून घ्या.
केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ८.२५ टक्के व्याजदराला अंतिम मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे देशातील सुमारे ७ कोटी पीएफ खातेदारांच्या खात्यांमध्ये व्याज जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वित्त मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) प्रस्तावाला हिरवा कंदीलदिला आहे.
यापूर्वी २ मार्च २०२६ रोजी EPFO च्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ८.२५ % व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आणि त्यानंतर तो अंतिम मंजुरीसाठी वित्त मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता.
हेही वाचा: ठाकरेंना ट्रिपल शॉक आमदार, खासदार आता नगरसेवक…कोण उरेल की नाही?
पीएफ खात्यात व्याज कधी जमा होईल?
वित्त मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर EPFO आता खातेदारांच्या पीएफ खात्यांमध्ये व्याजाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चालू महिन्यातच व्याजाची रक्कम खात्यांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे. नव्या तांत्रिक प्रणालीमुळे व्याजाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये वर्ग केली जाईल.
गेल्या काही वर्षातील व्याजदर
EPFO ने आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीही ८.२५ % व्याजदर कायम ठेवला होता. त्याआधी २०२३-२४ मध्ये व्याजदर वाढवून ८.२५ % करण्यात आला होता. २०२२-२३ मध्ये हा दर ८.१५ टक्के होता.
मार्च २०२२ मध्ये २०२१- २२साठी व्याजदर ८.१० टक्क्यांवर आणण्यात आला होता. हा गेल्या चार दशकांतील सर्वात कमी व्याजदर मानला जातो.
याशिवाय, २०२०-२१ मध्ये ८.५० टक्के, २०१९-२० मध्ये ८.५० टक्के, २०१८-१९ मध्ये ८.६५ टक्के, २०१७-१८ मध्ये ८.५५ टक्के, तर २०१६-१७ मध्ये ८.६५ टक्के व्याज देण्यात आले होते. २०१५- १६ मध्ये हा दर ८.८० टक्के होता. २०१३-१४ आणि २०१४- १५ या दोन्ही वर्षांत ८.७५ टक्के व्याज मिळाले होते. २०१२-१३ मध्ये ८.५० टक्के आणि २०११-१२ मध्ये ८.२५ टक्के व्याजदर लागू होता.
पीएफ शिल्लक कशी तपासाल?
खातेदारांना त्यांच्या पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम EPFO च्या अधिकृत पोर्टलवर लॉगिन करून पाहता येते. तसेच, नोंदणीकृत मोबाईल क्रमकांवरून मिस कॉल किंवा इतर डिजिटल सुविधांच्या माध्यमातूनही खाते शिल्लक तपासता येते. सध्या वित्त मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यामुळे चालू महिन्यातच व्याजाची रक्कम खात्यांमुळे जमा होण्याची शक्यता वाढली आहे.





