Maharashtra Budget 2026 | आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) हे राज्याचा 2026-27 चा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2026-27 मांडत आहेत. विशेष म्हणजे हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांकडून सादर केला जात आहे. तसेच आजचा अर्थसंकल्प अजितदादांना (Ajit Pawar) समर्पित आहे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
हेही वाचा – व्हायरल वक्तव्यामुळे वसंत मोरे अडचणीत, पोलिसांकडून गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थखाते मुख्यमंत्री फडणवीसांकडे आले. त्यामुळे आज त्यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “आज भाषण करताना मन जड झाले आहे, कारण अजित पवार आज आपल्यात नाहीयेत. अजित पवारांच्या जाण्याने कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. अर्थसंकल्प आणि अजितदादा हे नातं दृढ झालं आहे”, असं फडणवीस म्हणाले.
अजित पवारांचे भव्य स्मारक उभारले जाणार
“अजित पवारांनी दिलेल्या विकासाची दिशा आपल्याला प्रेरणा देत आहे. त्यांनी आत्तापर्यंत 11 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे”, असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं. तसेच पुढे त्यांनी अजित पवारांबाबत एक मोठी घोषणा केली. “लवकरच अजितदादांचे भव्य स्मारक उभारले जाणार आहे. तसेच त्यांच्या नावाने गतीमान नागरी सेवा पुरस्कार देखील दिला जाईल. आणि हा अर्थसंकल्प मी अजितदादांना समर्पित करतो”, अशा दोन मोठ्या घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केल्या आहेत.
मुख्यमंत्री फडणवीसांनी काय केल्या महत्त्वाच्या घोषणा?
पुढे मुख्यमंत्री फडणवीसांनी आणखी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. “1 फेब्रुवारी 2026 रोजी युवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. पुणे-मुंबई जलदगती ट्रेनसाठी तरतूद करण्यात आली आहे, यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचंही काम पहिल्या टप्प्यात पूर्ण झाले आहे. तसेच ते काम 2026 पर्यंत पूर्ण होईल”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
“संत गाडगे बाबा तीर्थक्षेत्र विकसित केले जाईल. तसेच 2026-27 या वर्षात महात्मा फुलेंच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आवश्यक निधी विविध उपयोजनांसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. तर 2026-27 हे वर्ष सामाजिक समता म्हणून साजरा करता येणार आहे”, अशा घोषणा देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी केल्या. तसेच हा अर्थसंकल्प विकसित महाराष्ट्राकडे जाणाऱ्या प्रवासाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.












