कोरेगाव (सातारा) :घरात खेळत असताना लहान भावाच्या डोळ्याला शुभ्राकडून लागलं. घरी आल्यानंतर वडील मारतील या भीतीने अकरा वर्षाच्या मुलीनं गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली.ही घटना कोरेगाव तालुक्यातील वडूथ येथे घडली.शुभ्रा प्रवीण राणे (वय 11) असे मृत मुलीचे नाव आहे. सोमवारी रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली.
प्रवीण राणे हे मुळचे रत्नागिरीतील असून ते त्यांच्या कुटुंबासमवेत गेल्या काही वर्षांपासून वडूथ येथे राहतात.साताऱ्यातील सदर बझारमध्ये त्यांचा वडापावचा स्टॉल आहे.त्यांना 3 मुली व एक मुलगा आहे.प्रवीण राणे आणि त्यांची पत्नी स्टॉलवर गेल्यानंतर लहान भाऊ आणि बहिणींना शुभ्रा सांभाळत असे. सोमवारी सायंकाळी तिच्याकडून लहान भावाच्या डोळ्याला चुकून लागलं.त्यामुळे ती घाबरली. रात्री वडील आल्यानंतर रागवतील आणि मारतील, अशी भीती शुभ्राच्या मनात निर्माण झाली.
लहान भावंडांना शेजारच्या रुममध्ये पाठवलं. यानंतर तिने खुर्चीवर डबा ठेवून ओढणीने गळफास घेतला.हा प्रकार तिच्या लहान भावंडांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शेजारच्यांना याची माहिती दिली. शेजारच्यांनी हे दृश्य पाहून तिच्या वडिलांशी संपर्क साधला. वडिलांनी घरी आल्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचाराआधीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.












