लखनऊ
रविवारी सकाळी आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर एक मोठा अपघात टळला. काकोरी पोलीस स्टेशन परिसरातील रेवाडी टोल प्लाझाच्या अगदी आधी एका डबल-डेकर एसी स्लीपर बसमध्ये भीषण आग लागली. आगीच्या ज्वाळा इतक्या भीषण होत्या की फक्त बसचा कवच शिल्लक राहिला आणि बाकी सर्व काही राखेत जळून खाक झालं.
टायर फुटल्यानं लागली आग
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रविवारी पहाटे 4:45 च्या सुमारास हा अपघात झाला. दिल्लीहून गोंडा इथं जाणाऱ्या 44 आसनी डबल-डेकर वातानुकूलित बसला (क्रमांक बीआर 28 पी 6333) अचानक आग लागली. बस चालक जगत सिंग यांनी सांगितलं की रेवाडी टोल प्लाझाच्या सुमारे 500 मीटर आधी अज्ञात कारणास्तव टायरला आग लागली, त्यानंतर आग लवकरच संपूर्ण बसमध्ये पसरली आणि ती आगीच्या गोळ्यात रुपांतरित झाली. काही प्रवाशांनी सांगितलं की ही आग टायर फुटल्यामुळं लागली असावी.
चालक जगत सिंग यांनी वाचवले प्राण
त्यावेळी बसमध्ये अंदाजे 39 प्रवासी होते. आग लागताच, चालक जगत सिंग यांनी हुशारी आणि तत्परता दाखवत बसमधून सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. आगीची माहिती मिळताच, स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या मदतीनं पोलीस पथकानं बसमध्ये अडकलेल्या सर्व 39 प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढलं.
आग विझवल्यानंतर बसची घेतली झडती
पोलिसांनी सांगितलं की सुमारे एक तासात आग पूर्णपणे आटोक्यात आली. आग विझवल्यानंतर, बसची कसून तपासणी केली असता आत कोणताही प्रवासी अडकला नाही आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित आहेत.




