Swami Govinddev Giri Maharaj : एकीकडे आपण दिल्लीत AI समिट भरवतो, त्या समिटममध्ये गलगोटियानं जे कलं, त्यावरून अजून आपली फजिती थांबली नाही, त्यात आता आजच्या युगात माहिती मिळवण्यासाठी आपल्याकडे गुगल नावाचा अथांग स्त्रोत आधीच उपलब्ध होता. मात्र, आता त्यात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ अर्थात ‘एआय’ नावाच्या एका नव्या चेटकिणीची भर पडली आहे,” अशा शब्दांत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी आधुनिक तंत्रज्ञानावर टीकास्त्र सोडले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित एका राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. त्यांच्या या विधानामुळे तंत्रज्ञान क्षेत्र आणि आध्यात्मिक वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. त्यांचं हे वक्तव्य ऐकूण हसावं, की रडावं हेच कळेनाय. AI नं जरी लोकांच्या नोकऱ्या खायला सुरूवात केली असली, तरी अनेक काम सोप्पी आणि प्रगतीच्या पुढच्या टप्प्यावरही नेली आहेत, पण महाराजांना त्याचं काय घेणंदेणं नाही.
तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त पुणे विद्यापीठात ‘ज्ञानोबा ते तुकोबा’ या विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या बीजभाषणात गोविंददेव गिरी महाराजांनी मानवी बुद्धी आणि तंत्रज्ञान यातील संघर्षावर भाष्य केले. ते म्हणाले की, एआय तंत्रज्ञान जरी माहितीच्या बाबतीत प्रगत वाटत असले, तरी ते मानवी मनाला भ्रमित करण्याची क्षमता ठेवते. या चेटकिणीच्या तावडीतून सुटण्यासाठी आणि योग्य दिशा मिळवण्यासाठी केवळ संतसाहित्यच मानवाला तारू शकते.
तंत्रज्ञानामुळे माहितीचा महापूर आला
महाराजांनी आपल्या भाषणात नमूद केले की तंत्रज्ञानामुळे माहितीचा महापूर आला आहे, परंतु मानवी विवेक आणि शांतता हरवत चालली आहे. गुगल आणि एआय हे माणसाला केवळ माहिती देऊ शकतात, पण जीवन जगण्याचे मूल्य आणि संस्कार देऊ शकत नाहीत. एआय हे दिसायला अत्यंत मोहक आणि उपयोगाचे वाटत असले, तरी ते मानवाचा स्वाभिमान आणि स्वतंत्र विचार करण्याची शक्ती हिरावून घेऊ शकते, असा धोक्याचा इशाराही त्यांनी दिला.
या टिप्पणीमुळे वारकरी संप्रदायात मोठा वाद
याच परिषदेत महाराजांनी संतांच्या ग्रंथांवर केलेल्या एका टिप्पणीमुळे वारकरी संप्रदायात मोठा वाद निर्माण झाला होता. त्यांनी समर्थ रामदास स्वामींचा ‘दासबोध’ हाच एकमेव स्वतंत्र ग्रंथ असल्याचे सांगून ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत ही ‘भाष्ये’ असल्याचे विधान केले होते. या विधानावरून वारकरी संप्रदायाने तीव्र निषेध व्यक्त केल्यानंतर, महाराजांनी “माझ्या विधानाचा विपर्यास झाला असून कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता,” असे म्हणत मोकळ्या मनाने क्षमा मागितली आणि वादावर पडदा टाकला.
महाराजांनी पुन्हा आपली खिल्ली उडवून घेतली
एआयला ‘चेटकीण’ संबोधून महाराजांनी पुन्हा आपली खिल्ली उडवून घेतली आहे, एक प्रकारे माहिती-तंत्रज्ञानाच्या आहारी न जाता आपल्या मुळांशी आणि संस्कृतीशी जोडलेले राहण्याचे आवाहन करणं काही वाईट नाही. पण नव्या तंत्रज्ञानाला चेटकीण बोलणं हे जरा जास्तच झालं बरं का महाराज. अशा वक्तव्यामुळे वादात सापडण्याची महाराजांची ही काही पहिलीच वेळ नाही, समान नागरी कायदा लागू होईपर्यंत लोकसंख्या संतुलन राखण्यासाठी प्रत्येक हिंदू दाम्पत्याने किमान ४ मुले जन्माला घालावीत, असे वक्तव्य त्यांनी २०१७ मध्ये उडुपी येथील धर्म संसदेत केले होते. त्यांनी २०२४ मध्येही या विधानाचा पुनरुच्चार केला होता. मे २०२५ मध्ये त्यांनी स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यावर टीका करताना त्यांना “फेक शंकराचार्य” म्हटले होते. तसेच, जे पंतप्रधान मोदींवर टीका करतात ते कोणत्याही पक्षाचे हस्तक असू शकतात, असेही त्यांनी म्हटलं होते.
सुरतेच्या छाप्याचा उल्लेख सध्याच्या ‘ईडी’च्या कारवायांशी
एवढंच नाही तर सप्टेंबर २०२४ मध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर मारलेल्या छाप्याचा उल्लेख केला आणि त्याची तुलना सध्याच्या ‘ईडी’च्या कारवायांशी केली. यावरून शिवप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती. अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख ‘श्रीमान योगी’ असा केला होता, ज्यावरून राजकीय स्तरावर चर्चा रंगली होती. फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांनी असे म्हटले होते की, जर मुस्लिम समाजाने काशी आणि मथुरा ही दोन मंदिरे आनंदाने हिंदूंकडे सोपवली, तर हिंदू समाज इतर ३००० वादग्रस्त स्थळांच्या मागण्या सोडून देईल.
महाराजांवर मनुवादी असल्याची टीका
अशी अनेक वादग्रस्त वक्तव्ये महाराज करत राहतात, त्यामुळे त्यांवर अनेकदा मनुवादी असल्याची टीकाही होते, मात्र तरीही महाराज काही केल्या चर्चेत राहण्यासाठी अशी वक्तव्ये करणे बंद करत नाहीत, महाराज बोलतात. वाद पेटतात आणि हे गुऱ्हाळं कायम सुरूच राहतं, आता एआयला चेटकीण म्हणाणाऱ्या महाराजांच्या वक्तव्यावर हसण्यापेक्षा त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे.





