The expressway was cleared after 36 hours : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गेल्या ३६ तासांपासून सुरू असलेला थरार अखेर थांबला असून, वाहतूक आता पूर्णपणे सुरळीत करण्यात आली आहे. मात्र, या एका अपघाताने प्रशासकीय सज्जतेचे आणि आपत्कालीन नियोजनाचे लक्तरे वेशीला टांगली गेली आहेत.
नेमकं काय घडलं?
परवा सायंकाळी ५ च्या सुमारास रसायनाने भरलेला एक टँकर महामार्गावर उलटला. त्यातून ‘प्रोपेलिन’ या अत्यंत ज्वलनशील वायूची गळती सुरू झाली. छोटासा ठिणगीचा स्पर्शही मोठ्या स्फोटाला आमंत्रण देऊ शकला असता, त्यामुळे खबरदारी म्हणून महामार्ग पोलिसांनी तात्काळ वाहतूक रोखली. मात्र, ही गळती रोखण्यासाठी आणि टँकर बाजूला करण्यासाठी प्रशासनाला तब्बल ३६ तास लागले.
हेही वाचा – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅस टँकर पलटी, वाहतूक कोंडीत प्रवाशी अडकले, राज ठाकरेंनी सरकारला सुनावले
कायमस्वरूपी यंत्रणेचा अभाव
या मधल्या काळात हजारो प्रवासी, लहान मुले आणि रुग्ण महामार्गावर अडकून पडले होते. प्रशासन त्याच्या पर्यंत पोहचलं नसल्याच प्रवाशांनी सागितल. एक्सप्रेसवेला २५ वर्षे पूर्ण होऊनही, अशा आणीबाणीच्या वेळी विरुद्ध बाजूने वाहतूक वळवण्यासाठी आपत्कालीन क्रॉस-ओव्हर कोणतीही कायमस्वरूपी यंत्रणा नसणे, ही नियोजनाची मोठी नामुष्की मानली जात आहे.
कोटींचा फटका आणि मुख्यमंत्र्यांचे आदेश
या कोंडीचा सर्वाधिक फटका एसटी महामंडळाला बसला आहे. १३९ बस फेऱ्या रद्द झाल्या असून, १६३ वाहने ट्रॅफिकमध्ये अडकल्याने महामंडळाला दोन दिवसांत सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएसआरडीसीला चौकशीचे आदेश दिले असून, सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
आज वाहतूक जरी सुरू झाली असली, तरी “अशा घटना भविष्यात घडल्या तर काय?” हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. केवळ टोल वसुलीत रस दाखवणाऱ्या प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ‘प्लॅन-बी’ कधी तयार करावा, अशी संतप्त भावना प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.






