शासन सेवेत नियमित समायोजन करण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यात कार्यरत १२०० कंत्राटी आरोग्य कर्मचारी आजपासून बेमुदत कामबंद आंदोलनावर जाणार आहेत. या संपामुळे आरोग्यसेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित होणार आहे. संपाच्या काळात सर्व आरोग्य संस्थांतर्गत अहवाल देणे बंद राहील. तसेच लसीकरण सत्रासह ऑनलाइन आणि ऑफलाइन स्वरूपातील सर्व प्रकारची कामे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. या संपामध्ये कंत्राटी डॉक्टर, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, लेखापाल, समुपदेशक, वॉर्डबॉय, सामाजिक कार्यकर्ते व इतर आरोग्य कर्मचारी सहभागी होणार आहेत.












